सिनेसृष्टीला अलविदा करणाऱ्या सना खानने आपल्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याची माहिती तिने चाहत्यांना दिली. दीड वर्षांपूर्वी सनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. आता सना खान दुसऱ्यांदा गरोदर आहे. सनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
सनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने ती पुन्हा प्रेग्नंट असल्याची माहिती दिली आहे. सनाने हा व्हिडीओ शेअर करत, 'तिचे तीन जणांचे कुटुंब आता चार जणांचे होणार आहे' असे कॅप्शन दिले आहे. तसेच पुढे तिने "अल्हमदुलिल्लाह, आमचा छोटा पाहुणा येणार आहे. सय्यद तारिक जमील मोठा भाऊ होण्यासाठी उत्सुक आहे" असे म्हटले आहे.
या पोस्टवर सना खानच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. एका युजरने, 'अल्लाह तुम्हाला एक सुंदर मुलगी देवो, तिचे नाव फातिमा ठेवा' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'अल्लाह तुम्हाला दीर्घायुष्य देवो, तुमचे अभिनंदन' असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एका यूजरने 'तुम्हाला तुमच्या नव्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा' असे म्हटले आहे. तर काही यूजर्सने एवढी काय घाई आहे असे म्हटले आहे.
वाचा: ए. आर. रेहमान गिटारवादक मोहिनीला करतोय डेट? दोघांनीही एकाच वेळी घटस्फोटाची घोषणा केल्याने चर्चांना उधाण
सना खान ही छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो बिग बॉस ६च्या घरात दिसली होती. त्यानंतर सना खानने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्याजय हो या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मात्र, सना खानने लवकरच टीव्ही आणि सिनेसृष्टीपासून स्वत:ला दूर केले. सना खानने २०२१ मध्ये सुरतमध्ये मुफ्ती अनस सय्यद सोबत लग्न केले होते. त्यानंतर सनाने ५ जुलै २०२३ रोजी सय्यद तारिक जमील या पहिल्या मुलाला जन्म दिला. आता सना पुन्हा एकदा प्रेग्नंट असल्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.