Bigg Boss Fame Actress Pavitra Punia: ‘बिग बॉस १४’च्या घरात अनेक चर्चित चेहरे बघायला मिळाले होते. याच सीझनमध्ये सहभागी झालेली अभिनेत्री पवित्रा पुनिया हिने नुकतेच काही धक्कादायक खुलासे केले आहेत. पवित्रा पुनिया ही टीव्ही विश्वातील अतिशय प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पवित्रा सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. नुकतीच तिने एका प्रसिद्ध वेबसाईटला मुलाखत दिली. यामध्ये तिने अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. सध्या तिची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे. पवित्रा पुनियाच्या या खुलाशांमुळे तिचे चाहते स्तब्ध झाले आहेत.
पवित्रा पुनिया म्हणाली की, बिग बॉस सोडल्यानंतर तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्पा सुरू झाला होता. इतकेच नाही, तर पवित्राने बिग बॉस नंतरच्या दिवसांची तुलना थेट लॉकडाऊनशी केली. पवित्रा म्हणाली की, बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिला खूप संघर्ष करावा लागला होता. तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले होते. या दरम्यान तिच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. पण, तिच्या सोबत असं नेमकं काय घडलं, असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे.
याबद्दल बोलताना पवित्रा पुनिया म्हणाली की, ‘२८ नोव्हेंबर रोजी मी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आणि बरोबर एक महिन्यानंतर माझ्या वडिलांचा अपघात झाला. त्यांना अर्धांगवायू झाला. अशा परिस्थितीत मी बिग बॉसमधून जे काही पैसे कमावले, ते मी त्यांच्या उपचारांसाठी आणि कुटुंबाची काळजी घेण्यासाठी खर्च करून टाकले. माझ्या कुटुंबाकडे पैसे नव्हते असे नाही, त्यांच्याकडे पैसा होता. पण, घरची मुलं जेव्हा कमावतात, तेव्हा प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी ते आई-वडिलांवर अवलंबून राहत नाहीत. उदाहरणार्थ, मी हॉस्पिटलमध्ये असताना, औषधं मागवायची असल्यावर आईकडे तिचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड मागत नव्हते.’
पवित्रा पुढे म्हणाली, ‘बिग बॉसनंतरचे पहिले दीड वर्ष माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते. तो दीड वर्षाचा काळ माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. मी डिप्रेशनमध्ये जात होते. माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. या काळात मला माझ्या जवळच्या लोकांनी सावरले, नाहीतर काय झाले असते माहित नाही. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर लोकांचे करिअर यशाच्या शिखरावर जाते. पण, त्यावेळी मी माझ्या कुटुंबाकडून पैसे घेत होते. काम होतं, पैसेही होते. मात्र, मला एकामागून एक हवे तसे प्रोजेक्ट मिळत नव्हते. कोविडच्या काळात मी कशासाठीही संघर्ष केला नाही. मी खूप आनंदी होतो. पण, बिग बॉस नंतरचा काळ माझ्यासाठी खूप वाईट गेला आहे.’