Who Is Bigg Boss 18 Winner : स्पर्धक अभिनेता करणवीर मेहरा याने ‘बिग बॉस १८’चा ग्रँड फिनाले जिंकून ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. करणवीरने विवियन डिसेनाला मागे टाकत बिग बॉस १८चे विजेतेपद पटकावले आहे. करणवीर मेहराने ५० लाख रुपयांचे रोख बक्षीसही जिंकले. या विजयामुळे करणवीरचे चाहते आणि कुटुंबीय खूप खूश होते. ‘बिग बॉस १८’च्या आधी करणवीर मेहरा याने गेल्या वर्षी ‘खतरों के खिलाडी’चा किताबही जिंकला होता. यावेळेस आपण बिग बॉसची ट्रॉफीही घरी घेऊन जाणार असल्याचं त्याने शोच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं.
ईशा सिंग, चुम दरांग, अविनाश मिश्रा, रजत दलाल, करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना हे स्पर्धक या खेळाच्या ‘टॉप ६’च्या शर्यतीत होते. मात्र, या फिनाले सोहळ्यामध्ये ईशा सिंग सर्वात आधी या घराबाहेर पडली होती. त्यानंतर चुम आणि नंतर अविनाश आऊट झाले. यानंतर रजत दलाल टॉप ३ मध्ये पोहोचला, पण टॉप २मध्ये तो स्थान मिळवू शकला नाही.
बिग बॉसचा हा प्रवास जवळपास ३ महिन्यांपूर्वी म्हणजेच ६ ऑक्टोबरला सुरू झाला होता. हे तीन महिने करणवीर मेहरासाठी खूप चढ-उताराचे ठरले होते. करणवीरच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते घरातील जेवणापर्यंतची भांडणे आणि वेगवेगळ्या गप्पा या शोमध्ये पाहायला मिळत होत्या. बिग बॉसच्या घरात त्याची मैत्रीण शिल्पा शिरोडकर हिने त्याला अनेकदा फसवले देखील होते. दुसरीकडे करणवीरला त्याच्या खेळाबद्दल आणि सुस्त वागणुकीबद्दल अनेकदा बिग बॉसकडून फटकारण्यात ही आले होते. खेळातील आपल्या उणिवा मागे टाकत करणवीरने आपल्या खेळात सुधारणा केली आणि बिग बॉसचा विजेता बनून त्याने स्वतःला सिद्ध केलं.
करणवीर मेहराच्या या घरातील एकूण प्रवासाबद्दल बोलायचे झाले, तर चुम दरांग ही त्याच्या या प्रवासाचा एक खास भाग होता. करणवीर आणि चुम दरांग यांच्या नात्याला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाली होती. करणवीर आणि चुमच्या चाहत्यांनी त्या दोघांच्या नावाचे हॅशटॅगही बनवले होते. शोमध्ये करणवीर आणि चुम यांच्या नात्यातील ताकद सातत्याने पाहायला मिळत होती. फिनाले सोहळ्यातही जेव्हा चुम दरांगला घराबाहेर काढलं गेलं, तेव्हा तिने करणवीरच्या हातात ट्रॉफी यायला हवी, अशी मनीषा बोलून दाखवली होती. अखेर करणवीरने तिची ही इच्छा पूर्ण केली.
संबंधित बातम्या