Bigg Boss 18 Who Is Chum Darang : कलर्स टीव्हीवरचा लोकप्रिय आणि वादग्रस्त रिॲलिटी शो'बिग बॉस १८' च्या घरात यंदा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती सगभागी होणार आहेत. या घरात यंदा'खतरों के खिलाडी' विजेत्या करणवीर मेहरापासून विवियन डिसेना, ॲलिस कौशिक, चाहत पांडे आणि शिल्पा शिरोडकरपर्यंत अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. या सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अरुणाचल प्रदेशची चुम दरांग. बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री चुम दरांग देखील सलमान खानचा प्रसिद्ध रिॲलिटी शो'बिग बॉस १८'मध्ये सहभागी होणार आहे.
'गंगूबाई काठियावाडी' आणि'बधाई दो' सारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये झळकलेली चुम दरांगआता या शोमधून टीव्हीवर पदार्पण करणार आहे. तिने'बधाई दो' या चित्रपटात भूमी पेडणेकरच्या लेस्बियन गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. या व्यक्तिरेखेमुळे चुम प्रसिद्धी झोतात आली होती. २०१७मध्ये तिने एका सौंदर्य स्पर्धेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.'मिस टियारा इंडिया इंटरनॅशनल २०१७'चा किताब जिंकण्यासोबतच चुम दरांग'मिस एशिया वर्ल्ड' आणि ‘मिस इंडिया अर्थ’मध्येही सहभागी झाली होती.
सौंदर्य स्पर्धा ते अभिनेत्री होण्यापर्यंतचा हा प्रवास चुम दरांगसाठी अजिबात सोपा नव्हता. एका मुलाखतीत तिने स्वतः सांगितले होते की, आजवरच्या या प्रवासात तिला वर्णद्वेषाचाही सामना करावा लागला होता. अनेकदा लोक तिला'चिंकी' किंवा'मिस चायनीज' म्हणायचे. २०१८मध्ये चुम दरांग हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत लोकांच्या वर्णद्वेषी वृत्तीबद्दल प्रश्न विचारले होते.'मी भारतीय आहे' असे लिहिलेले एक मोठे पोस्टर शेअर करताना तिने विचारले होते की, ‘माझ्या देशाचे प्रिय पंतप्रधान, माझ्याच देशात मला किती दिवस अनोळखी व्यक्तींसारखे वागवले जाईल?-चुम दरांग, भारताचा वंचित नागरिक.’
‘बिग बॉस १८’ची यंदाची थीम भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य अर्थात ‘टाईम का तांडव’ असं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी बिग बॉस स्वतः काही निर्णय घेणार आहेत. म्हणजेच सलमान खानच्या शोचे संपूर्ण नियंत्रण आता बिग बॉसच्या हातात असणार आहे. ‘बिग बॉस १८’मध्ये सहभागी होणारे स्पर्धक आता १०५ दिवस चालणाऱ्या या शोमध्ये येणाऱ्या ट्विस्ट आणि टर्न्सचा सामना करणार आहेत. आता या शोमध्ये काय काय घडणार, हे पाहण्यासाठी सगळे आतुर झाले आहेत.
संबंधित बातम्या