Bigg Boss 18 Latest Update: छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस’च्या सीझन १८ला आता जोरदार सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसापासून घरातील काही सदस्यांमध्ये खूप तणाव पाहायला मिळत आहे. बिग बॉसने दिलेले पहिले टास्क पूर्ण करण्यात घरातील काही सदस्य अयशस्वी झाले आहेत. पहिल्या टास्कमध्ये अपयशी ठरल्यानंतर अरफीन खान, अविनाश आणि करणवीर मेहरा यांच्यात थोडा वाद झाला. आता या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. शोच्या नवीन प्रोमोमध्ये सीझनचे पहिले नॉमिनेशन होताना दिसत आहे. यावेळी विवियन डिसेना आणि चाहत पांडे यांच्यात मोठी लढत होणार आहे.
नुकत्याच समोर आलेल्या शोच्या प्रोमोमध्ये गुणरत्न सदावर्ते आणि करणवीर मेहरा यांच्यातही वाद झाल्याचे दिसून येत आहे. गुणरत्न सदावर्ते यांना नॉमिनेट करताना करणवीर म्हणतो की, 'असं वाटतंय की, गुणरत्नजी वेगळ्याच खेळात आहेत.' यानंतर गुणरत्न सदावर्ते म्हणतात, ‘त्याचे नाव करणवीर आहे, मी त्याला ओळखत नाही.’ यावर करण म्हणतो, ‘तुम्हाला माझे नाव माहीत असले पाहिजे.’ यानंतर गुणरत्न सदावर्ते प्रोमोमध्ये जोरात हसताना दिसले आहेत.
यानंतर चाहत पांडे नॉमिनेशनमध्ये विवियन डिसेनाचे नाव घेते. ती म्हणते की, तो खूप गर्विष्ठ आहे. यावर विवियन म्हणतो की, ‘आणि हा गर्विष्ठपणा तेव्हा येते जेव्हा समोरची व्यक्ती वाईट वागते.’ बिग बॉसने तुम्हाला विचारले नाहीये, असे म्हणत चाहत हा वाद वाढवताना दिसली. या दरम्यान पुन्हा एकदा दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची होते आणि यावेळी विवियन तिला तोंडावर बोट ठेवून शांत राहण्यास सांगतो.
या प्रोमो व्हिडीओमध्ये बिग बॉस करणवीर, अविनाश आणि ईशा यांना विशेष अधिकार देत असल्याचे दिसत आहे. बिग बॉसने तिन्ही सदस्यांना तुरुंगात राहण्यासाठी एका स्पर्धकाचे नाव निवडण्यास सांगितले आहे. यावर करणवीर गुणरत्न यांचे नाव घेतो. यावर गुणरत्न सदावर्ते चिडतात आणि मोठा तमाशा करतात. मी तुरुंगात जाणार नाही, असे ते सरळ बजावतात. ‘प्रश्न अत्याचाराचा नाही, तर भूमिकेचा आहे. कोर्टातही आम्ही अशीच भूमिका बजावतो. मी जाणार नाही. त्यापेक्षा मी हा शो आता सोडेन.’ यानंतर प्रोमोमध्ये दिसते की, घरातील सर्व सदस्य गुणरत्न सदावर्ते यांना समजवण्याचा प्रयत्न करतात.
संबंधित बातम्या