Bigg Boss 18 latest update: 'बिग बॉस ओटीटी ३'नंतर आता 'बिग बॉस १८’ची तयारी सुरू झाली आहे. आता सलमान खानच्या शोचा भाग कोण बनणार याबाबत वेगवेगळे कयास बांधले जात आहेत. सलमानच्या शोसाठी 'बिग बॉस ओटीटी ३'च्या अनेक सदस्यांची नावेही समोर येत आहेत. त्याचवेळी आता समोर आलेल्या या बातमीनंतर पुन्हा एकदा सर्वांची उत्कंठा वाढणार आहे. या शोसाठी लवकेश कटारियाशी संपर्क साधला जाऊ शकतो, असे म्हटले जात होते. मात्र, त्याने हा शो करण्यास नकार दिला आहे. त्यानंतर आणखी २ नावे समोर येत आहेत.
दरम्यान, आता या शोमध्ये कोणाच्या नावाचा समावेश केला जाऊ शकतो, याबाबत मोठा खुलासा झाला आहे. 'बिग बॉस ओटीटी ३'ची सर्वात वादग्रस्त स्पर्धक म्हणजेच कृतिका मलिक हिला या शोसाठी विचारणा झाल्याची बातमी समोर आली आहे. असे बोलले जात आहे की, गोलू पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये दिसणार आहे. आता पायल आणि कृतिकानेच या वृत्तांमध्ये किती तथ्य आहे हे उघड केले आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या त्यांच्या या व्लॉगमध्ये दोघांनीही चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे.
पायलने तिच्या फॅमिली व्लॉगमध्ये खुलासा केला आहे की, कृतिकाला 'बिग बॉस १८'साठी ऑफर मिळाली आहे. खुद्द पायलने तिच्या व्लॉगवर चाहत्यांना हे सांगितले आहे. या व्लॉगमध्ये ती काही पोस्टर्स आणते आणि सर्वांना सांगते की, गोलूला बिग बॉसची ऑफर मिळाली आहे आणि ती ‘बिग बॉस १८’मध्ये येत आहे. यानंतर पायल आणि कृतिकाही आनंदाने नाचताना दिसत आहेत. व्लॉगमध्ये दोघींचा उत्साह स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, नंतर दोघींमध्ये राग रुसवा देखील दिसून येतो.
पायल या व्लॉगमध्ये म्हणते की, 'आमची गोलू जात नाहीये, मी तिला घरी राहायला सांगितले आहे. तिला ४० दिवस राहायला सांगतेय, मी निघतेय. पण, ती मला जाऊ देत नाही.’ यानंतर कृतिका येते आणि पायलला सांगते की, 'मी तुला असं उदास बघू शकत नाही. मी बिग बॉसमध्ये जाणार आहे, बिग बॉसने मला कृतिका म्हणून हाक मारली की, मला खूप आवडते.’ यावर पायल तिची खिल्ली उडवते आणि म्हणते की, बिग बॉस तुला बोलवतही नाहीत. आता खरंच या दोघींपैकी एक ‘बिग बॉस १८’च्या घरात दिसणार का, हे येत्या काळात कळणार आहे.