Shilpa Shirodkar on Rajat Dalal : करणवीर मेहरा याला विजेता म्हणून घोषित केल्यानंतर बिग बॉस १८ चं पर्व संपलं असलं तरी या रिअॅलिटी शोची चर्चा सुरूच आहे. घरातून बाहेर पडल्यानंतरही स्पर्धक एकमेकांवर राग काढताना दिसत आहे. विशेषत: रजत दलाल आणि शिल्पा शिरोडकर यांच्यातील शाब्दिक वाद चर्चेचा विषय ठरला आहे.
अलीकडेच एल्विश यादवसोबतच्या एका पॉडकास्टमध्ये रजत दलालनं घरातील अनेक स्पर्धकांवरचा राग काढला. रजतनं शिल्पा शिरोडकरसाठी 'नीच' हा अपमानास्पद शब्द वापरला. शिल्पा शिरोडकर हिनं यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शिल्पा शिरोडकरनं नुकतीच टाइम्स ऑफ इंडिया टीव्हीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं बिग बॉस १८ तिच्या प्रोफेशनल लाईफबद्दलही मोकळेपणानं उत्तरं दिली. रजत दलाल हिनं तिला 'नीच' म्हटल्याबद्दलही तिची प्रतिक्रिया जाणून घेण्यात आली. त्यावर तिनं संयमी पण बोचरं उत्तर दिलं.
'बिग बॉसच्या घरात असतानाच त्याच्या शब्दांचा माझ्यावर परिणाम होणं थांबलं होतं. त्याच्या बोलण्यावर काही प्रतिक्रिया द्यावी असंही मला वाटत नाही. कारण, माझा प्रत्येकावर विश्वास आहे. त्याला जे योग्य वाटतंय ते तो करतोय, बोलतोय आणि मला जे योग्य वाटतंय ते मी करतोय. बिग बॉसच्या घरात मी त्याला प्रतिसाद देणं टाळलं होतं, आता बाहेरही मी तसंच करणं योग्य राहील, असं शिल्पा म्हणाली.
रजतच्या बोलण्यानं ती दुखावली गेली आहे का असं तिला विचारण्यात आलं. त्यावर ती म्हणाली, 'त्यानं जे शब्द वापरले त्याबद्दल मला वाईट वाटत नाही, कारण एखादी व्यक्ती कशी आहे ते आम्हाला त्यांच्या मुलाखतीतून किंवा त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीतून कळतं. त्याला वाटत असेल की असं बोलावे आणि लोकांशी असंच वागावे तर त्याला आम्ही काय करू शकतो? मला त्यात रसही नाही, असं शिल्पा शिरोडकर म्हणाली.
'बिग बॉसच्या घरात जे काही घडलं, ते घडून गेलं आहे. मी सर्व काही तिथंच सोडून आले आहे. भविष्यात कधी कोणाशी भेट झाली तर एकमेकांशी खूप चांगले राहू असं मला वाटतं. त्या घरात कोणत्याही नात्याशिवाय जगणं खूप कठीण होतं आणि मी इतके दिवस घरात राहिले यात सर्वांचा वाटा होता, असंही शिल्पा म्हणाली.
संबंधित बातम्या