Bigg Boss 18 Contestant Tajinder Pal Singh Bagga: बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान याचा लोकप्रिय टीव्ही रिॲलिटी शो 'बिग बॉस १८' सुरू झाला आहे. चाहत पांडे, शिल्पा शिरोडकर, शहजादा धामी, अविनाश मिश्रा या कलाकारांसह तजिंदर पाल सिंह बग्गा हे देखील या शोचा एक भाग बनले आहेत. तजिंदर पाल सिंह बग्गा हे भाजपचे नेते असून, ते सोशल मीडियावरही सक्रिय असतात. प्रत्येक मुद्द्यावर आपले बेधडक मत मांडत असल्यामुळे ते प्रचंड प्रसिद्ध आहेत. तजिंदर पाल सिंह बग्गा यांचा जन्म २४ सप्टेंबर १९८५ रोजी झाला. ते दिल्लीतील टिळक नगर येथील रहिवासी आहेत. जर, त्यांच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केलेले नाही. मात्र, त्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU), दिल्ली येथून बॅचलर प्रिपरेटरी प्रोग्राम ही पदवी घेतली. हा कोर्स अशा लोकांसाठी आहे ज्यांना ग्रॅज्युएशन करण्याची इच्छा आहे, परंतु ते १२वी उत्तीर्ण झालेले नाहीत.
तजिंदर बग्गा यांनी ‘इग्नू’मधून शिक्षण घेण्यासोबतच चीनच्या राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठातूनही शिक्षण घेतले आहे. त्यांनी येथून नॅशनल डेव्हलपमेंटचा एक महिन्याचा डिप्लोमा कोर्स केला आहे. याशिवाय त्यांनी प्रसिद्ध भारतीय शेफ संजीव कुमार यांच्या अकादमीतून कुकिंगचा कोर्सही केला आहे.
जेव्हा ताजिंदर १६ वर्षांचे होते, तेव्हा ते भाजप युवा मोर्चा अर्थात भारतीय जनता युवा मोर्चामध्ये (BJYM) सामील झाले.२०१७मध्ये ते दिल्ली भाजपचे प्रवक्तेही बनले आणि त्यानंतर २०२०मध्ये ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना हरिनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. २०२१मध्ये भाजपने त्यांना भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव बनवले. ‘बिग बॉस १८’च्या प्रीमियर एपिसोड दरम्यान,तजिंदर यांनी सांगितलं की, ते वयाच्या चौथ्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसमध्ये सामील झाले होते आणि वयाच्या १४व्या वर्षी पहिल्यांदा तुरुंगात गेले होते.
तजिंदर पाल सिंह बग्गा हे सोशल मीडियावरही सक्रिय असतात आणि नेहमी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करत असतात. इंस्टाग्रामवर त्यांचे १.२७ लाख फॉलोअर्स आहेत. तर, ट्विटर म्हणजेच एक्सवर १.२ मिलियन म्हणजेच १२ लाख लोक त्यांना फॉलो करतात.
संबंधित बातम्या