Munawar Faruqui Apology: सलमान खान होस्ट केलेल्या रियॅलिटी शो ‘बिग बॉस १७’चा विजेता आणि स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने आपल्या एका शोमध्ये केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. मुनव्वर याने तळोजा येथील शोमध्ये कोकणी लोकांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. जेव्हा त्याच्या परफॉर्मन्सची काही सेकंदाची क्लिप इंटरनेटवर व्हायरल होऊ लागली, तेव्हा हे प्रकरण वाढू लागले. मुनव्वर फारुकीने आपल्या शोमध्ये कॉमेडी करताना म्हटलं होतं की, ‘कोकणी लोक चू** बनवतात.’ म्हणजेच कोकणी लोक मूर्ख बनवतात.
यानंतर मुनव्वर फारुकीने हा आपल्या विनोदाचा आणि कामाचा भाग असल्याचे स्पष्ट केले होते. स्टँडअप कॉमेडीदरम्यान प्रेक्षकांशी संवाद साधताना कलाकार त्यांच्यावर विनोद करतात, ही अतिशय सामान्य प्रथा आहे, असे त्याने म्हटले होते. माफी मागताना मुनव्वर फारुकी याने ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांच्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. 'कॉमेडियन म्हणून माझ्या क्लिपमुळे काही लोक दुखावले जात आहेत, माझा हेतू कुणालाही दुखावण्याचा नव्हता, हे माझ्या लक्षात आले आहे.
मुनव्वर फारुकीने म्हटले की, 'शोमध्ये सर्व प्रकारचे लोक होते. मराठी लोक होते, मुस्लिम लोक होते, हिंदू लोक होते. पण, जेव्हा आपण इंटरनेटवर अशा गोष्टी पाहतो, लक्षात घेतो, तेव्हा आपल्याला समजते की प्रकरण काय आहे. मी सर्वांची माफी मागू इच्छितो आणि सॉरी म्हणू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.' या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देत मुनव्वरसारख्या हिरव्या सापाला पाकिस्तानात पाठवायला जास्त वेळ लागणार नाही, अशी धमकी दिली आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, मुनव्वर फारुकी ‘बिग बॉस १७’मुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चेत आला होता. परंतु, त्याने लोकांची मने जिंकली आणि ट्रॉफी पटकावण्यात तो यशस्वी ठरला. ‘बिग बॉस १७’ जिंकल्यानंतर मुनव्वर आपल्या स्टँडअप कॉमेडीच्या दुनियेत परतला. पण, आता तो पुन्हा वादात अडकला आहे. मुनव्वर याच्या या विनोदाचा मनसेनेही निषेध केला असून, मुनव्वर आपल्या कॉमेडीमुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तो अशा अनेक संवेदनशील विषयांवर बोलून चर्चेत राहिला आहे.