मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 17: सलमान खानसमोरच विकी जैन आणि अंकिता लोखंडेचं कडाक्याचं भांडण! अभिनेत्री म्हणाली...

Bigg Boss 17: सलमान खानसमोरच विकी जैन आणि अंकिता लोखंडेचं कडाक्याचं भांडण! अभिनेत्री म्हणाली...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 07, 2024 09:46 AM IST

Bigg Boss 17 Latest Update: अंकिता आणि विकी यांच्यात जोरदार भांडण झालंय, जे बघून खुद्द सलमान खानलाही धक्का बसला.

Bigg Boss 17 Latest Update
Bigg Boss 17 Latest Update

Bigg Boss 17 Latest Update:बिग बॉस १७’चं पर्व सध्या खूप गाजत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात खेळ कधी बदलेल, हे कोणालाच माहीत नाही. काहीच दिवसांपूर्वी अभिषेक कुमारला या घरातून एलिमिनेट करण्यात आले होते. मात्र, अभिषेकच्या एलिमिनेशनमुळे प्रेक्षक नाराज झाले होते. यानंतर लोकांनी अभिषेकला पुन्हा घरात आणण्याची मागणी केली होती. ‘बिग बॉस’ आणि अंकिता लोखंडे यांच्या निर्णयाला चुकीचे ठरवत केवळ चाहतेच नाही, तर कलाकारांनीही अभिषेकचे समर्थन केले. आता, शनिवारच्या ‘वीकेंड का वार’ भागामध्ये सलमान खान सगळ्यांनाच एक मोठा धक्का देत, अभिषेकला घरात परत आणलं आहे. मात्र, याचवेळी अंकिता आणि विकी यांच्यात जोरदार भांडण झालंय, जे बघून खुद्द सलमान खानलाही धक्का बसला होता.

‘वीकेंड का वार’चा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी सलमान खानचाही विचार केला नाही. दोघांनीही त्याच्यासमोर भांडण सुरू केले होते. अंकिता आणि विकी यांच्यातील कडाक्याचं भांडण पाहून सलमान देखील थबकला. एका टास्कदरम्यान अंकिता विकीला म्हणते की, 'तो विनाकारण कोणाच्याही बाबतीत सतत ढवळाढवळ करतो, विनाकारण भांडतो. मुन्ना अजिबात काहीच बोलत नाही.' यानंतर अंकिताने तिच्या हातातील हातोडीने बोर्डावर ‘फालतू’ लिहिलेल्या शब्दांवर वारंवार मारते.

अंकिताचे बोलणे ऐकून विकी जैन म्हणाला की, 'तू मला फालतू बोलशील, अशी अपेक्षा नव्हती. आपण इथे खेळ खेळायला आलो असलो तरी, आपल्यात एक नातं आहे. मी ते लक्षात ठेवलंय, पण तू विसरून गेली आहेस.’ यानंतर अंकिता म्हणते की, ‘तुला काय वाटतं, मी तुझ्याऐवजी मुन्नाची निवड करेन?’ यावर विकी म्हणाला की, तिने त्याची फसवणूक केली आहे. यावेळी सलमान खानही त्यांच्या या भांडणाकडे पाहतच राहिला. आता सलमान खान यावर काय प्रतिक्रिया देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

WhatsApp channel

विभाग