Bigg Boss 17 Latest Episode: ‘बिग बॉस १७’च्या नुकत्याच पार पडलेल्या भागात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात मीडियाने या घरात एन्ट्री घेतली होती. यावेळी मीडियाने या शोच्या ‘टॉप ६’ फायनलिस्ट अंकिता लोखंडे, विकी जैन, मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण यांना त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल अनेक प्रश्न विचारले. पत्रकार परिषदेत सर्वाधिक चर्चेचा मुद्दा विकी आणि अंकिताचा होता. दोघांना अनेक प्रश्न विचारण्यात आले आणि यादरम्यान विकीने सर्वांसमोर गुडघ्यांवर बसून, नॅशनल टीव्हीवर अंकिताची माफी मागितली.
अंकितासोबतच्या वागणुकीबद्दल विकीला वारंवार प्रश्न विचारले गेले. त्याला अक्षरशः ‘रेड फ्लॅग’ देखील म्हटले जात आहे. यावेळी विकी जैनला प्रश्न विचारण्यात आला की, या शोनंतर तुम्ही कपल थेरपीसाठी जाल का? तेव्हा, विकी जैन म्हणाला, 'थेरपी अशी आहे की, सध्या मी केवळ गुडघे टेकून तिला सॉरी म्हणू इच्छित आहे.’ यानंतर विकी गुडघ्यावर बसून पत्नी अंकिता लोखंडे हिची माफी मागतो.
यावेळी विकी जैन आपली चूक कबूल करतो आणि म्हणतो, 'सॉरी मंकू, माझ्याकडून अनेक चुका झाल्या आहेत, मला माफ कर.' विकी पुढे म्हणाला की, ‘मला एका गोष्टीबद्दल खरं सांगायचे आहे. या घराबाहेर सुद्धा आम्ही दोघे एकत्र राहतो, त्यामुळे त्यावेळी कदाचित आम्हला आमच्या चुका सांगायला कोणी नसतं आणि अशावेळी आपल्याला आपल्या चुका कळतही नाहीत. आज १०० दिवसात पहिल्यांदाच असे घडत आहे की, इतके लोक मला तेच तेच प्रश्न विचारत आहेत, त्यामुळे कदाचित मी जेव्हा मागे वळून बघतो, तेव्हा मला असे वाटते की त्यावेळेस अशा काही गोष्टी घडल्या ज्या खरंच व्हायला नको होत्या.’
स्वतःची पाठराखण करताना विकी जैन म्हणाला की, तो अजिबात वाईट नाही आणि अंकिताच्या समर्थनात नेहमीच उभा राहिला आहे. विकी जैन पुढे म्हणाला की, 'मी अंकिताचा खूप आभारी आहे. कारण तिच्यामुळेच मी इथे आलो आहे आणि हे मान्य करण्यात मला कसलाही संकोच वाटत नाही. होय, मी शोमधील माझ्या प्रवासाबद्दल अधिक विचार करत होतो आणि आमच्या नात्याकडे लक्ष देत नव्हतो. माझी चूक झाली.’ विकीच्या बोलण्याने आणि माफी मागण्याने आता अंकिता लोखंडे खूश झाली आहे.