Happy Birthday Bhumika Chawla: बॉलिवूड अभिनेता सलमान खान स्टारर चित्रपट 'तेरे नाम' रिलीज झाला आणि भूमिका चावला हिच्या करिअरला एक वेगळीच झळाळी मिळाली होती. या चित्रपटाने तिच्या करिअरची दिशाच बदलून टाकली होती. ‘तेरे नाम’ केवळ भूमिकासाठीच नाही तर, सलमान खानसाठी देखील खूप खास होता. या चित्रपटाने त्याच्याही करिअरला एक वेगळी दिशा दिली. सतत फ्लॉप चित्रपटांचा सामना करणाऱ्या सलमानच्या करिअरमध्ये ‘तेरे नाम’ हा चित्रपट वरदान ठरला. चित्रपट सुपरहिट तर झालाच, पण चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि शैलीही लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाली. तसेच, या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणारी अभिनेत्री भूमिका चावलाही रातोरात सुपरस्टार झाली. या चित्रपटानंतर भूमिका चावलाचे करिअर यशाच्या शिखरावर होते.
‘तेरे नाम’ची हीच अभिनेत्री भूमिका चावला आज (२१ ऑगस्ट) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. भूमिका चावलाने पावडरच्या जाहिरातीतून ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश केला होता. १९७८मध्ये आजच्या दिवशी दिल्लीत भूमिका चावलाचा जन्म झाला. भूमिकाचे वडील भारतीय लष्करात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. भूमिका तिच्या तीन भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. भूमिकाचा भाऊही भारतीय लष्करात अधिकारी म्हणून कार्यरत आहे. वडील सैन्यात असल्यामुळे भूमिका चावलाचे शालेय शिक्षण देशाच्या विविध भागांमध्ये झाले आहे.
यानंतर भूमिकाने दिल्लीतून करिअरला सुरुवात केली. ग्लॅमर दुनियेत यशाचे स्वप्न पाहणारी भूमिका चावला १९९७मध्ये मुंबईत आली. भूमिकाने मुंबईत आल्यानंतर म्युझिक व्हिडीओ आणि जाहिरातींमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिची पॉन्ड्स ब्रँड पावडरची जाहिरात चांगलीच प्रसिद्ध झाली. भूमिका चावलालाही या जाहिरातीतून बरीच ओळख मिळाली. यानंतर भूमिका साऊथ इंडस्ट्रीकडे वळली. २०००मध्ये साऊथ चित्रपट ‘युवाकुडू’मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
भूमिका चावलाला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. या चित्रपटानंतर भूमिकाने साऊथमध्ये अनेक चित्रपट केले. याचदरम्यान भूमिकाला ‘तेरे नाम’ या बॉलिवूड चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत दिसणारी भूमिका चावलाची कारकीर्दही या चित्रपटामुळे हिट ठरली. यानंतर भूमिका चावला चित्रपटांमध्ये काम करत राहिली. भूमिकाने तिच्या करिअरमध्ये ६४ चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. भूमिकाची गणना बॉलिवूडमधील चर्चित अभिनेत्रींमध्ये केली जात होती. आजही भूमिका चावलाचे लाखो चाहते आहेत. भूमिकाचे सोशल मीडियावरही खूप चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर भूमिकाला १.४ दशलक्षाहून अधिक लोक फॉलो करतात.