Bhool Bhulaiya 3: रूहबाबासोबत दोन-दोन मंजुलिका; ‘भूल भुलैया ३’ बघायला जाताय? आधी रिव्ह्यू वाचा...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bhool Bhulaiya 3: रूहबाबासोबत दोन-दोन मंजुलिका; ‘भूल भुलैया ३’ बघायला जाताय? आधी रिव्ह्यू वाचा...

Bhool Bhulaiya 3: रूहबाबासोबत दोन-दोन मंजुलिका; ‘भूल भुलैया ३’ बघायला जाताय? आधी रिव्ह्यू वाचा...

Nov 03, 2024 11:23 AM IST

Bhool Bhulaiya 3 Movie Review : अभिनेता कार्तिक आर्यनचा हॉरर कॉमेडी ‘भूल भुलैया ३’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तुम्हीही हा चित्रपट बघायला जात असाल तर आधी वाचा हा रिव्ह्यू…

भूल भुलैया 3
भूल भुलैया 3

Bhool Bhulaiya 3 Movie Review : दिवाळीच्या निमित्ताने बॉक्स ऑफिसवर एकाच वेळी दोन चित्रपटांची जबरदस्त टक्कर पाहायला मिळाली. कार्तिक आर्यनचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया ३’ आणि अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ हे दोन्ही चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाले आहेत. त्यामुळे आता कमाईच्या बाबतीत कोणता चित्रपट बाजी मारणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दिग्दर्शक अनीस बज्मी पुन्हा एकदा दिवाळीला आपला कल्ट क्लासिक चित्रपट ‘भूल भुलैया ३’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटामध्ये यावेळी रूह बाबा म्हणजेच कार्तिक आर्यनचा सामना एक नाही तर दोन मंजुलिकांशी होणार आहे. प्रेक्षकांना घाबरवण्यात हा चित्रपट कितपत यशस्वी ठरला हे जाणून घेऊया. वाचा चित्रपटाचा रिव्ह्यू...

काय आहे कथानक?

अनीस बज्मी दिग्दर्शित 'भूल भुलैया ३' या हॉरर कॉमेडी चित्रपटात कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित, विद्या बालन, विजय राज, राजपाल यादव, संजय मिश्रा आणि राजेश शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रुहान उर्फ रूह बाबा (कार्तिक) हा कोलकात्यातील लोकांना फसवणारा मांत्रिक बाबा आहे. मग, त्याची भेट रक्तघाटाची राजकुमारी मीराशी (तृप्ती डिमरी) होते. त्याने आपल्या राज्यात येऊन भूत पळवण्याचे काम करावे, अशी तिची इच्छा आहे. कारण, तिचे वडील राजा साहेब (विजय राज) यांना खात्री आहे की, या राजवाड्यात २०० वर्षांची हडळ मंजुलिका राहते. पण, इथेच या कथेत ट्विस्ट येतो. रूहबाबा राजवाड्यात पोहोचल्यावर त्याला नवे रहस्य कळते.

bhool bhulaiyaa 3 : कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया ३’ने पहिल्याच दिवस रचला विक्रम! किती झाली कमाई? पाहा आकडे

त्याला कळते की त्याचे रूप या राज्याच्या दिवंगत राजकुमारासारखेच आहे आणि तो त्याचा पुनर्जन्म आहे, असे प्रत्येकाचे मत आहे. त्यानंतरच राजघराण्याला मंजुलिकेपासून सुटका करून घेण्याचा निर्णय तो घेतो. पण इथे एक प्रॉब्लेम आहे की मंजुलिका कोण आहे? मल्लिका (विद्या बालन) किंवा मंदिरा (माधुरी दीक्षित). कारण दोघांची ही अॅक्टिव्हिटी मंजुलिकासारखी आहे. त्या दोघीही रुहान अर्थात रूह बाबाच्या मागे पडतात. मात्र, शेवटी एक मोठं गुपित उघडतं, ज्यामुळे संपूर्ण कथाच बदलून जाते. आता हे गुपित जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पहावा लागेल.

कसा आहे अभिनय?

अभिनेता कार्तिक आर्यनने चित्रपटाचा पहिला भाग जोडण्याचा प्रयत्न केला आहे. पण, दुर्दैवाने दिग्दर्शक अनीस बज्मीने त्याला बहुतेक दृश्यांमध्ये अक्षय कुमारचा क्लोन बनवले आहे. कार्तिकची बॉडी लँग्वेज, लूक आणि कॉमेडी हे सगळं अक्षयची आठवण करून देणारं आहे. अक्षय कुमारने ही फ्रँचायझी सुरू केली होती. मात्र, कार्तिकने आपले शंभर टक्के देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. तृप्ती डिमरीही आपल्या अभिनयातून फारशी कमाल दाखवू शकली नाही.

‘भूल भुलैया ३’ची तुलना ‘स्त्री २’शी केली जात आहे. कारण दोन्ही चित्रपट एकाच फ्रँचायझीचे हॉरर कॉमेडी आहेत. पण, 'स्त्री २' पहिल्या भागाशी पूर्णपणे जोडलेला आहे, तर ‘भूल भुलैया ३’ हा चित्रपट केवळ एका व्यक्तिरेखेवर आधारित आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची मुख्य अभिनेत्री कियारा अडवाणीच्या व्यक्तिरेखेचे काय झाले, हेही चित्रपटात दाखवण्यात आले नाही. या प्रश्नांची उत्तरे कधीच मिळाली नाहीत. या चित्रपटात विद्या बालनचा नवा लूक दाखवण्यात आला आहे.

Whats_app_banner