आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदी शैलीने अवघ्या रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेणारे अभिनेते म्हणजे भरत जाधव. नाटक असो, मालिका असो किंवा चित्रपट सगळ्याच क्षेत्रात आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारे अभिनेते म्हणून भरत जाधव यांचे नाव आवर्जून घेतले जाते. स्वतःचा एक प्रचंड मोठा चाहता वर्गही त्यांनी निर्माण केला. अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही त्यांनी पाऊल ठेवले. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी भरत जाधव एक आगवा वेगळा प्रयोग करणार आहेत. एकाच दिवशी तीन नाटकाचे प्रयोग सादर करणार आहेत.
मराठी रंगभूमीवर 'सही रे सही', 'श्रीमंत दामोदर पंत', 'ऑल दि बेस्ट', 'आमच्या सारखे आम्हीच' अशी अनेक नाटके त्यांनी गाजवली असून काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याकडे भरत जाधव यांचा कायमच कल राहिला आहे. त्यामुळे यंदाही असेच काहीतरी नवीन घेऊन येण्यास भरत जाधव सज्ज झाले आहेत. काही वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट रोजी 'पुन्हा सही रे सही' या नाटकाचा शुभारंभ करण्यात आला होता. याच खास क्षणाचे औचित्य साधत भरत जाधव येत्या १५ ऑगस्ट रोजी नाट्यरसिकांसाठी ट्रिपल धमाका घेऊन येत आहेत.
एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग एकाच नाट्यगृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात हे प्रयोग होणार असून या दिवशी रसिकांना भरत जाधव यांच्या वेगवेगळ्या पात्रांची झलक अनुभवायला मिळणार आहे. यावेळी सकाळी 'अस्तित्व', दुपारी 'मोरूची मावशी' तर सायंकाळी 'पुन्हा सही रे सही' या तीन नाटकांचे प्रयोग होणार आहेत. वैशिष्टय म्हणजे 'पुन्हा सही रे सही' या नाटकाचा ४४४४ वा प्रयोग यावेळी होणार असून या प्रयोगाला राज ठाकरे यांची उपस्थिती लाभणार आहे.
वाचा: जॉन अब्राहमनं घेतली ऑलिम्पिक पदक विजेत्या मनू भाकर हिची भेट! फोटो पाहून नेटकरी संतापले, काय आहे कारण?
भरत जाधव आणि चिन्मयी सुमीत यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'अस्तित्व' या नाटकाची निर्मिती भरत जाधव यांनी केली असून या नाटकाला महाराष्ट्र शासनचा व्यावसायिक नाटकासाठी सर्वोत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कारही मिळाला आहे. तर भरत जाधव यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे. या नाटकाचे आतापर्यंत ५८ प्रयोग झाले आहेत. तर मोरूची मावशी या नाटकाने आतापर्यंत ८६२ प्रयोगांचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे हा ट्रिपल धमाका प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.