Happy Birthday Bharat Jadhav : आपल्या दमदार अभिनयसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांनी आजवर अनेक मनोरंजक चित्रपट दिले आहेत. मराठी रंगभूमीवरही ते प्रचंड सक्रिय आहेत. भरत जाधव यांची अनेक नाटकं इतकी गाजली आहेत की, त्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी जागा मिळवली आहे. अशाच नाटकांपैकी एक म्हणजे ‘सही रे सही’. आज म्हणजेच १२ डिसेंबर रोजी भरत जाधव यांचा ५१वा वाढदिवस आहे. याच निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या ‘सही रे सही’ या नाटकाचा एक खास किस्सा...
‘सही रे सही’ हे नाटक मराठी नाट्यप्रेमींच्या हृदयाच्या खूप जवळचं आहे. या नाटकाबद्दल भरत जाधव अनेकदा वेगवेगळ्या आठवणी शेअर करत असतात. त्यांनी स्वतः एक पोस्ट लिहीत आपलं केदार शिंदे यांच्यासोबत इतकं भांडणं झालं होतं की, त्यांनी नाटकं सोडण्याची धमकी दिली होती. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ''मी 'सही रे सही' सोडतोय… असं मी १९ वर्षांपूर्वी केदारला म्हणालो होतो. याला कारण होतं 'गोड गोजिरी' गाणं. ‘श्रीमंत दामोदर पंत’मध्ये आधीच एकदा हे गाणं करून झालं होतं. आणि केदारची इच्छा होती की 'सही रे सही' मधील हरी या पात्राची एन्ट्री याच गाण्याने व्हावी. आधीच्या नाटकात वापरलेलं गाण पुन्हा या नव्या नाटकात घेण्याबद्दल मी नाराज होतो. याला कारण होतं की, आज जरी 'श्रीमंत दामोदर पंत' हे रसिकांच्या पसंतीच नाटक असलं तरी प्रत्यक्षात रंगभूमीवर या नाटकाला तितकं यश त्या काळी मिळालं नव्हतं.'
'केदार आपल्या निर्णयावर ठाम होता आणि या गाण्यावर न नाचण्यावर मी ठाम होतो. शब्दाला शब्द वाढत गेला, अक्षरशः आमच्यात भांडण झाली आणि मी 'सही रे सही' सोडण्याचा निर्णय घेतला. या भांडणातून तोडगा काढण्यासाठी शेवटी आम्हा दोघांचाही प्रिय मित्र अंकुश चौधरी याने कृष्णशिष्ठाई केली. आणि एका प्रयोगा पुरतं हे गाणं करून पाहायचं ठरवलं. जर पहिल्या प्रयोगात या गाण्याला चांगला रिस्पॉन्स नाही, मिळाला तर हे गाणं काढून टाकायचं ठरलं.'
'१५ ऑगस्ट २००२ला पहिला प्रयोग झाला आणि या गाण्यावर अक्षरशः टाळ्या आणि शिट्ट्यांनी नाट्यगृह दणाणून गेलं. आजही या गाण्याला वन्स मोअर रिस्पॉन्स मिळतो. गोड गोजिरी वरील दामुचा डान्स आज एक सिग्नेचर स्टेप बनलीये. आणि 'सही रे सही' चा इतिहास सर्वश्रुत आहे. आज जवळपास ३०-३५ वर्षापासूनची आमची तिघांची मैत्री आहे. जर मी त्या वेळी सही सोडलं असतं, तर कदाचित हा सगळा पुढचा प्रवास झालाच नसता. "काही वेळेला आपलं भलं आपल्याला कळतं नसतं पण आपल्या माणसांना कळतं असतं', असं भरत जाधव म्हणाले.
संबंधित बातम्या