Bharat Ganeshpure In Farms : 'चला हवा येऊ द्या', 'फू बाई फू' यासारख्या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारे अभिनेते भारत गणेशपुरे सध्या काय करतायत असा प्रश्न त्यांच्या सगळ्याच चाहत्यांला नक्कीच पडला असेल. काही महिन्यांपूर्वी 'चला हवा येऊ द्या' हा शो ऑफ एअर गेला. त्यानंतर या शोमध्ये कलाकार सध्या काय करतायत? त्यांचं काय सुरू आहे? हे जाणून घेण्यासाठी त्यांचे सगळे चाहते उत्सुक असतात. आता अभिनेता भारत गणेशपुरे यांनी स्वतःच एक व्हिडिओ शेअर करत आपल्या चाहत्यांना अपडेट दिली आहे. आपल्या धमाल विनोदांनी आणि अभिनयाने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणारे आणि प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारे अभिनेते भारत गणेशपुरे सध्या त्यांच्या शेतात रमले आहेत.
भारत गणेशपुरे हे सध्या आपल्या गावी शेती करण्यात व्यस्त झाले आहेत. दरम्यान, ते आपल्या शेताचे व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या शेताची झलक दाखवली आहे. यंदाच्या वर्षी त्यांनी शेतात गहू, वाल अशी पिकं लावली आहेत. याशिवाय त्यांच्या शेतात केळीची बाग, फुलांची झाडं आणि इतर वेगवेगळ्या प्रकारची पिकं देखील आहे. याशिवाय ते शेतामध्ये इतरही काही पीक घेताना दिसत आहेत.
आपल्या पिकांची वाढ कशी होते आणि कोणतं पीक कुठे लावलंय, याची झलक ते आपल्या व्हिडिओ मधून चाहत्यांना दाखवत असतात. इतकंच नाही, तर त्यांनी शेताची देखरेख करण्यासाठी शेताच्या मध्यभागी एक छानसं झोपडी वजा घर देखील बांधलं आहे. इथे राहून, झाडाच्या सावलीचा आनंद घेत खाटेवर झोपून शेतात निसर्ग सौंदर्याचा आनंद घेताना दिसले आहेत. एकंदरीतच अभिनयातून काही वेळासाठी ब्रेक घेऊन भारत गणेशपुरे आपल्या शेतीच्या आवडीला जोपासत आहेत.
भारत गणेशपुरे हे अमरावतीतील दर्यापूरचे असून, त्यांचे बालपण गावातच गेले. पुढे त्यांनी श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातून बीएसस्सी अॅग्रीकल्चर केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते नोकरीच्या शोधात निघाले. मनात अभिनयाची आवड होतीच, म्हणून त्यांनी स्पर्धा परीक्षेचं कारण देऊन मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला.
संबंधित बातम्या