मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bhagirathi Missing Movie: महिलांवरील अत्याचारांना वाचा फोडणारा ‘भागीरथी मिसिंग’! ‘या’ खास दिवशी होणार रिलीज

Bhagirathi Missing Movie: महिलांवरील अत्याचारांना वाचा फोडणारा ‘भागीरथी मिसिंग’! ‘या’ खास दिवशी होणार रिलीज

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 05, 2024 08:54 AM IST

Bhagirathi Missing Movie Release Date: चित्रपटाच्या नावाप्रमाणेच एक अत्यंत हटके आणि संवेदनशील विषय 'भागीरथी Missing' या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Bhagirathi Missing Movie Release Date
Bhagirathi Missing Movie Release Date

Bhagirathi Missing Movie Release Date: सध्या मराठी चित्रपटामध्ये सातत्याने वेगळे आणि वास्तववादी विषय हाताळले जात आहेत. दिग्दर्शक सचिन वाघ यांनीही एक अत्यंत हटके आणि संवेदनशील विषय 'भागीरथी Missing' या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. सस्पेन्स, थ्रीलर असलेला हा आगामी चित्रपट ‘महिला दिनी’ म्हणजेच ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजसाठी महिला दिनाचे निमित्त साधण्यामागे देखील एक विशेष कारण आहे. ‘भागीरथी मिसिंग’ हा चित्रपट महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर भाष्य करणार आहे.

'भागीरथी Missing'च्या कथेबद्दल बोलताना निर्माता-दिग्दर्शक सचिन वाघ म्हणाले की, ‘प्रेक्षक चित्रपटगृहात येतात ते करमणुकीसाठी , त्यामुळे चित्रपट तयार करताना करमणुकीला प्राधान्य दिले गेले आहे. बेपत्ता झालेल्या एका महिलेचा शोध घेताना तिचे पूर्व आयुष्य उलगडत जाते, हा प्रवास संगीतमय करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. सध्या एकूणच महिलांवरील अत्याचार आणि मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढलेले आहे, त्यामुळे आम्ही करमणुकीबरोबरच हा विषयसुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाचे शीर्षक ‘भागीरथी मिसिंग’ या नावामुळे या प्रश्नाच्या गांभीर्याविषयी जर अवेअरनेस किंवा जनजागृती झाली, तर मला नक्कीच आनंद वाटेल.’

Swatantrya Veer Savarkar Trailer: रणदीप हुड्डाचं मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन! ‘सावरकर’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिला?

ही भूमिका आव्हानात्मक होती: शिल्पा ठाकरे

'सह्याद्री मोशन पिक्चर्स' निर्मित, प्रमोद कुलकर्णी प्रस्तुत ' आणि सचिन वाघ दिग्दर्शित 'भागीरथी missing' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, या ट्रेलरला संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटाविषयी बोलताना मुख्य अभिनेत्री शिल्पा ठाकरे म्हणाली की, ‘भागीरथी missing' हा चित्रपट करणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. भागीरथी ही व्यक्तिरेखा साकारणे मोठे चॅलेंज होते. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना अत्यंत धक्कादायक आहेत. तसेच माझे बालपण गावाकडे गेलेले असल्यामुळे गावातील तरुणी साकारणे ही गोष्ट मला पुन्हा त्या वातावरणात घेऊन गेली. भागीरथी पडद्यावर साकारतानाचा माझा अनुभव खूप अविस्मरणीय होता.’

दिग्गजांची टीम!

'भागीरथी Missing' या चित्रपटात अभिनेत्री शिल्पा ठाकरे, सुरेश विश्वकर्मा, अभिषेक अवचट, चंद्रकांत मूळगुंदकर, संदीप कुलकर्णी आणि पूजा पवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा-संवाद संजय इंगूळकर यांची आहे. या चित्रपटाला आशुतोष कुलकर्णी यांचे संगीत लाभले असून, मंदार चोळकर, डॉ. संगीता गोडबोले यांची गीते आहेत. पं. शौनक अभिषेकी यांनी या मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे, ही विशेष जमेची बाब आहे. सुवर्णा राठोड, शरयू दाते आणि जयदीप वैद्य यांनी इतर गीते गायली आहेत.

चित्रपटाचे छायांकन दिनेश कंदरकर, ध्वनि संयोजन राशी बुट्टे, कला दिग्दर्शन नितीन बोरकर, रंगभूषा दिनेश नाईक, वेशभूषा शिवानी मगदुम यांनी केले आहे. तर कार्यकारी निर्माते योगेश जोशी आहेत. 'भागीरथी Missing' हा चित्रपट येत्या ८ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

IPL_Entry_Point