Bastar Box Office Collection Day 2: बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा हिचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे थंड पडलेला दिसत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नाहीये. ‘द केरळ स्टोरी’ या धमाकेदार चित्रपटानंतर अभिनेत्री अदा शर्मा आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचा हा दुसरा चित्रपट होता. परंतु, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ‘द केरळ स्टोरी’पेक्षा निम्मीही कामगिरी करू शकलेला नाही. अदा शर्माच्या ‘बस्तर’ या चित्रपटाला दोन दिवसांत २ कोटींचा आकडाही गाठता आलेला नाही.
एकीकडे प्रेक्षकांकडून थंड प्रतिसाद मिळत असताना, दुसरीकडे समीक्षकांनी देखील 'बस्तर: द नक्षल स्टोरी' या चित्रपटाला काही विशेष प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत. ‘द केरळ स्टोरी’प्रमाणेच हा देखील प्रोपगंडा चित्रपट असल्याचा आरोपही केला जात आहे. मात्र, मागील चित्रपटाची कमाई पाहता यावेळीही सुदिप्तो आणि अदा यांची जोडी प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करेल, असे सगळ्यांना वाटत होते. मात्र, तसे झाले नाही.
‘बस्तर: द नक्षल स्टोरी’ हा चित्रपट १५ मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘बस्तर’ हा चित्रपट ‘योद्धा’ आणि ‘शैतान’सारख्या चित्रपटांना टक्कर देऊ शकलेला नाही. पहिल्या दिवशी या चित्रपटाने अवघ्या ४० लाख रुपयांची कमाई केली. निर्मात्यांना दुसऱ्या दिवशी चित्रपटाकडून थोड्या अपेक्षा होत्या. परंतु, शनिवारी देखील चित्रपटाच्या कमाईत फारच कमी वाढ झाली. दुसऱ्या दिवशीच्या अंदाजे आकडेवारीनुसार, हा चित्रपट फक्त ७५ लाख रुपयांचा व्यवसाय करू शकला आहे. दोन दिवसांत ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’ या चित्रपटाने १.१५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
अदा शर्मा आणि सुदीप्तो सेन यांच्या ‘द केरळ स्टोरी’ला बॉक्स ऑफिसवर जोरदार प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ८.३० कोटी आणि दुसऱ्या दिवशी ११ कोटींचा व्यवसाय केला. मात्र, ‘बस्तर’ला प्रेक्षकांचा अजिबातच प्रतिसाद मिळत नाहीये. या चित्रपटाची निर्मितीही विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे. हा चित्रपट प्रचाराचा चित्रपट नसल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
संबंधित बातम्या