Balasaheb Thackeray: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० फेब्रुवारी रोजी तीन दिग्गजांना भारतरत्न जाहीर केला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्व. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियावर यासंबंधी मोहीमदेखील सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, मनसेने त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
६ मिनिटांचा बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडीओ शेअर करत मनेसेने "स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी कधी चित्रपटात काम केलं होतं का? तर त्याचं उत्तर 'हो' आहे... ठाकरे घराण्याचं आणि कलावंतांचं नातं काल-परवाचं नाही तर ते गेल्या ४ पिढ्यांचं आहे. आचार्य अत्रे यांच्या आग्रहास्तव प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रथम 'राष्ट्रीय पुरस्कार' विजेत्या 'श्यामची आई' या मराठी चित्रपटात अभिनय केला होता हा किस्सा सर्वश्रुत आहेच. परंतु बाळासाहेब ठाकरे यांनीही एका चित्रपटात काम केलं आहे, हे तितकंसं कुणाला ज्ञात नाही."
वाचा: कंगना रणौतला व्हायचे पंतप्रधान, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
पुढे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, "मार्मिक सुरु होण्यापूर्वी बाळासाहेब व्यंगचित्रांशिवाय बोधचिन्ह, चित्रचिन्ह, चित्रपटाचे पोस्टर्स, जाहिराती असं सर्व काही काम करायचे. बड्या चित्रपट निर्मिती संस्थांची बोधचिन्हही त्यांनी घडवली होती. तेव्हांचच एक लक्षवेधी काम म्हणजे चित्रपटात झळकणं... हो, गुरुदत्त यांनी दिग्दर्शित केलेला आणि मुख्य भूमिका साकारलेल्या चित्रपटात बाळासाहेबांनी शब्दशः हातभार लावला होता."
१९५५ साली प्रदर्शित झालेल्या 'मिस्टर आणि मिसेस ५५' या चित्रपटात नायक गुरुदत्त यांनी व्यंगचित्रकाराची भूमिका साकारली आहे. चित्रपटात कुठे ना कुठे गुरुदत्त त्यांना व्यंगचित्र काढताना दाखवणे क्रमप्राप्त होते. म्हणून चित्रपटातील एका प्रसंगात गुरुदत्त व्यंगचित्र रेखाटताना दाखवले आहेत. त्या फ्रेममध्ये चित्र रेखाटताना गुरुदत्त यांचा क्लोजअप आहे पण जेव्हा कॅमेरा चित्राकडे वळतो तेव्हा जो रेखाटतानाचा हात आहे तो २९ वर्षीय बाळासाहेब ठाकरेंचा आहे. त्या चित्रातील फटकारे, शैली पाहिल्यानंतर तुम्हालाही हे जाणवेल. त्यातली रेषा आणि शैली बाळासाहेबांचीच आहे.
मनसेने शेअर केलेल्या पोस्टमध्ये याबाबत उल्लेख करण्यात आला आहे. "आता याला कर्मधर्मसहयोग म्हणा किंवा अजून काही. पण चित्रपटात नायकाने ते व्यंगचित्र एका आडमुठ्या व्यक्तीविरोधात काढले होते आणि ते वृत्तपत्रात प्रकाशित झाले होते. त्यानंतर ज्या प्रवृत्तीविरोधात चित्र काढले त्यांचा तिळपापड होणे स्वाभाविक होते. हेच बाळासाहेबांनी राजकीय व्यंगचित्रकार आणि नेता म्हणून राजकारण्यांच्याबाबतीत केले" असे म्हटले आहे.
पोस्टमध्ये सगळ्यात शेवटी, "मात्र, त्यात एक गोष्ट सर्वांच्याच कल्पनेपलीकडली झाली ती म्हणजे एक व्यंगचित्रकार चित्रांच्या माध्यमातून जनमानस चेतवतो, त्यांचं रूपांतर संघटनेत होतं, अनेक सामान्य घरातील माणसं सत्तेच्या पदापर्यंत पोहोचतात आणि स्वतःच्या संघटनेची राज्यावर सत्ता येते. व्यंगचित्रकार ते राज्यकर्ता हा प्रवास इतका विलक्षण आहे की, नंतर 'बाळासाहेब ठाकरे' हे व्यक्तिमत्त्वच चित्रपटाचा विषय बनतं. चित्रपटसृष्टीतलं एक असंही वर्तुळ बाळासाहेबांनी पूर्ण केलं होतं हे विशेष. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वास स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना 'भारतरत्न' सन्मान मिळायलाच हवा !" असे म्हटले गेले आहे.
संबंधित बातम्या