शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसा त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे, नातू आदित्य ठाकरे आणि पुतण्या राज ठाकरे पुढे चालवताना दिसत आहेत. पण बाळासाहेब ठाकरे यांना एक नातू आहे, जो राजकारणात नव्हे तर बॉलिवूडमध्ये करिअर करण्यास सज्ज झाला आहे. ऐश्वर्य ठाकरे असे त्यांच्या नातवाचे नाव असून २०२५मध्ये त्याचा पहिला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा हा चित्रपट पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या आणि चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरे यांच्या मुलाचे नाव ऐश्वर्य ठाकरे आहे. बाळासाहेबांचा मुलगा जयदेव आणि स्मिता यांचे लग्न झाले होते, पण २००४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. आता त्यांचा मुलगा ऐश्वर्य ठाकरे बॉलिवूडमध्ये ग्रँड एन्ट्रीसाठी सज्ज झाला आहे. मात्र, ऐश्वर्यला कोणत्या दिग्दर्शकाने लाँच केले आहे आणि त्याच्या चित्रपटाचे नाव काय आहे याबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही.
ऐश्वर्य हा पुढच्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असला तरीही सोशल मीडियावरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याचे फोटो तुफान व्हायरल होताना दिसतात. चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटात ही ऐश्वर्य असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम करत होता. त्याने या संधीचे सोनं केलं असे म्हणायला हरकत नाही.
वाचा: पदेशात स्थायिक झालेली माधुरी दीक्षित भारतात का परतली? अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा
कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्यापासूनच ऐश्वर्यला अभिनयात करिअर करायचे होते. महाविद्यालयात असताना त्याने अनेक नाटकांमध्ये काम केल्याचे त्याच्या सोशल मिडिया पोस्टवरुन स्पष्ट होते. याशिवाय गेली काही वर्षे तो चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षणही घेतले आहे. ऐश्वर्य ठाकरे आणि पूजा बेदी यांची मुलगी अलाया फर्निचरवाला अनेकदा एकत्र पार्टी करताना दिसले होते. तसेच त्यांना बऱ्याचवेळा एकत्र डिनरला जाताना आणि बाहेर फिरताना पाहिले होते. त्यामुळे ते दोघे डेट करत असल्याचे बोलले जात आहे.