दिग्दर्शक केदार शिंदे यांचा महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद भेटत मिळाला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. आता त्यापाठोपाठ त्यांचा 'बाई पण भारी देवा' हा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.
‘बाईपण भारी देवा’ या ट्रेलरच्या सुरुवातीला अभिनेत्री वंदना गुप्ते या मंगळागौरीच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी चौकशी करताना दिसत आहेत. परंतु मंगळागौर खेळण्यासाठी जोडीला इतर महिलांचीही गरज असल्याचे त्यांना कळते. सुरुवातीला काही महिलांनी नकार दिल्यानंतर ती तिच्या बहिणींना एकत्र करते. प्रत्येकीला त्यांची त्यांची कामं, त्यांच्या त्यांच्या अडचणी असतात. अर्ध आयुष्य संपलं आणि आपण स्वतःसाठी जगलोच नाही असं व्हायला नको, असा विचार करून त्या मंगळागौर खेळायचे ठरवतात.
चित्रपटाचा ट्रेलर पाहाता या मंगळागौरीच्या खेळामुळे त्या सहा जणींमध्ये नातं कसं तयार होतं? यावर त्यांच्या नवऱ्यांची काय प्रतिक्रिया असते? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे चित्रपट पाहिल्यावर मिळणार आहेत.
केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट आपल्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. सिनेमाचं नाव जसं भारी भरकम आहे तशीच सिनेमातील स्टारकास्टही तगडी आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते,सुकन्या मोने,शिल्पा नवलकर,सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशा मातब्बर अभिनेत्री एकत्र पडद्यावर पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. 'बाईपण भारी देवा' हा एक कौटुंबिक चित्रपट असून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करण्यासाठी ३० जून,२०२३ रोजी चित्रपटगृहात आपल्या भेटीस येत आहे.
संबंधित बातम्या