Baipan Bhari Deva: अर्ध आयुष्य संपलं, पण..; 'बाईपण भारी देवा'चा टीझर प्रदर्शित
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Baipan Bhari Deva: अर्ध आयुष्य संपलं, पण..; 'बाईपण भारी देवा'चा टीझर प्रदर्शित

Baipan Bhari Deva: अर्ध आयुष्य संपलं, पण..; 'बाईपण भारी देवा'चा टीझर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Apr 29, 2023 08:45 AM IST

Baipan Bhari Deva Teaser: केदार शिंदेंच्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Baipan Bhari Deva
Baipan Bhari Deva

दिग्दर्शक केदार शिंदे यांचा महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद भेटत आहे. अशातच केदार शिंदेचा आगामी चित्रपट 'बाई पण भारी देवा'चा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरने सर्वांचे लक्ष वेधले असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

'बाईपण भारी देवा' आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे. अर्थात चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे. चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. काही कारणामुळे एकमेकींपासून विभक्त झालेल्या आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना सामोऱ्या जाणाऱ्या या सहा बहिणींची कथा म्हणजे सर्वसामान्य आयुष्यातील सुपर वुमनची कथा आहे. आपल्या समाजात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या महत्त्वपूर्ण भूमिका त्यांच्या-त्यांच्या पातळीवर बजावत असतात पण आपलंच कळत-नकळत त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. 'बाईपण भारी देवा' या चित्रपटातील अभिनेत्री समाजातील अशाच स्त्रियांचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत.
वाचा: ३२००० महिला ISISमध्ये कशा सामिल झाल्या? 'या' सिनेमातून उलगडणार रहस्य

जिओ स्टुडियोजचा 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट प्रत्येक स्त्रीला आता स्वतःसाठी देखील जगायला शिकवणार हे नक्की.. तेव्हा आता तयार रहा.. केदार शिंदेंचा स्पेशल टच असलेला सहा गुणी अभिनेत्रींनी चित्रपटात उडवलेली धमाल अनुभवायला! या चित्रपटाचा टीझर एका खास मुहूर्तावर रिलीज करण्यात आला आहे. आज २८ एप्रिल रोजी, केदार शिंदे यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'महाराष्ट्र शाहीर' महाराष्ट्रभरात रिलीज झाला असुन त्यांचाच आगामी बहुचर्चित चित्रपट 'बाईपण भारी देवा' याचा टिजर ही आज एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आला आहे.

केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट आपल्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. सिनेमाचं नाव जसं भारी भरकम आहे तशीच सिनेमातील स्टारकास्टही तगडी आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते,सुकन्या मोने,शिल्पा नवलकर,सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशा मातब्बर अभिनेत्री एकत्र पडद्यावर पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. 'बाईपण भारी देवा' हा एक कौटुंबिक चित्रपट असून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करण्यासाठी ३० जून,२०२३ रोजी चित्रपटगृहात आपल्या भेटीस येत आहे.

Whats_app_banner