Baipan Bhaari Deva: ना इव्हेंट, ना प्रमोशन… तरीही का गाजतोय ‘बाईपण भारी देवा’? वाचाच!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Baipan Bhaari Deva: ना इव्हेंट, ना प्रमोशन… तरीही का गाजतोय ‘बाईपण भारी देवा’? वाचाच!

Baipan Bhaari Deva: ना इव्हेंट, ना प्रमोशन… तरीही का गाजतोय ‘बाईपण भारी देवा’? वाचाच!

Updated Jul 18, 2023 07:17 PM IST

Baipan Bhaari Deva Marathi Film: ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचं फारसं प्रमोशन झालं नाही तर, इतकी गर्दी आली कुठून आणि या यशाचं गमक नेमकं काय? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

Baipan Bhaari Deva Marathi Film
Baipan Bhaari Deva Marathi Film

Baipan Bhaari Deva Marathi Film: सध्या सगळीकडेच एकाच आवाज ऐकू येतोय तो म्हणजे ‘बाईपण भारी देवा’. अगदी ट्रेन असो वा बस, प्रवास करताना सहज तीन-चार वेळा ‘बाईपण भारी देवा, बाईपण भारी रं...’ असं गाणं ऐकू येतं. मराठमोळे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. काहीच महिन्यांपूर्वी त्यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातून त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्ण अध्याय उलगडून दाखवला होता. यानंतर पाठोपाठच त्यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट तसा सुरुवातील फार कुणाच्या लक्षातही आला नसेल. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फारसा तामझामही झाला नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने कोणता मोठा इव्हेंटही झाल्याचे ऐकिवात नाही. मात्र, इतकं सगळं असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकच धमाल केली. या चित्रपटाचं प्रमोशन झालंच नाही तर, इतकी गर्दी आली कुठून आणि या यशाचं गमक नेमकं काय? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. याच उत्तर मिळालं ते चित्रपटगृहात गेल्यानंतर... हाऊसफुलचा बोर्ड मिरवणाऱ्या या चित्रपटाचं तिकिट मिळवणंही फार कठीण वाटत होतं. अगदी मोजक्याच सीट रिक्त असल्याचं चित्र दिसत होतं.

Rajesh Khanna: अमिताभ बच्चन यांच्या एन्ट्रीमुळे राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीला लागली होती उतरती कळा!

चित्रपट अन् जोरदार फोटोसेशन

चित्रपटगृहात पोहोचल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे महिला प्रेक्षकांची तुफान गर्दी.. अगदी सजूनधजून महिला वर्ग हा चित्रपट पाहायला जात आहे. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या पोस्टरवर देखील या चित्रपटातील स्टारकास्टचा नऊवारीतील ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला आहे. मात्र, याचा फायदा देखील चित्रपटाला झाला आहे. ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट पाहायला जाणारा महिला वर्ग देखील याच गेटअपमध्ये चित्रपटगृहात पोहोचत आहे. नाकात नथ, नऊवारी साडी अन् गॉगल या लूकमध्येच चित्रपट पाहून, त्यानंतर पोस्टरसोबत फोटोसेशनचा आनंदही घेतला जात आहे.

कथानकातही दिसली हळवी बाजू!

आता या चित्रपटाच्या कथानकाबद्दल बोलायचं झालं तर, अतिशय साधं सोपं, पण तितकंच प्रभावी असं हे कथानक मनाला भावणारं आहे. या चित्रपटात एकूण सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. ही कथा जरी बहिणींची असली तरी याची सुरुवात मात्र, आई आणि सासू यामध्ये कोण सरस या प्रश्नावरून सुरू होते. मुलगी लग्नानंतर जन्मदात्या आईऐवजी सासूवर अधिक प्रेम करते, हे पाहून त्या आईचा जळफळाट होतो. सासूपेक्षा आई कशी सरस हे दाखवण्यासाठी मंगळागौर स्पर्धेत भाग घेतला जातो. इथून सुरू होतो तो बहिणींच्या नात्याचा नवा प्रवास... सहा सख्ख्या बहीणी असल्यातरी त्यांच्या नात्यात काहीना काही कारणामुळे दुरावा आलेला आहे. मात्र, हाच दुरावा मिटवून त्या आपापल्या कोशातून कशा बाहेर पडतात, हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

स्त्रियांच्या समस्यांवर प्रभावी भाष्य

स्वतःच्या स्वप्नांना बांधून सासरसाठी झटणारी स्त्री, पती आणि मुलांची जबाबदारी घेऊन नोकरी सांभाळणारी स्त्री, पतीने घटस्फोटाची नोटीस दिल्यानंतर खचून गेलेली स्त्री, केवळ पतीच्या पैशावर जगण्यापेक्षा स्वतःच्या हिंमतीवर काहीतरी करून दाखवण्याची आशा बाळगणारी स्त्री, देवाने जिच्या पदरचं मातृत्व हिरावून घेतलं अशी स्त्री... या चित्रपटात स्त्रीच्या आयुष्यातील वेगवेगळ्या समस्या अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत. चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकीला यातील एका पात्रात तरी आपला चेहरा दिसतो. हीच या चित्रपटाची जमेची बाजू आहे. ना अंगप्रदर्शन ना आयटम साँग केवळ बाईच कसा बाईचा आधार बनते, हेच या चित्रपटाने दाखवलं आहे.

माऊथ पब्लिसिटी या चित्रपटासाठी अतिशय महत्त्वाची ठरली आहे. ‘बाईपण भारी चित्रपट’ पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाने इतरांकडे या चित्रपटाचं कौतुक केलं. कौतुक ऐकल्यानंतर त्या व्यक्तीने देखील जाऊन हा चित्रपट पाहिला आणि हीच प्रक्रिया पुढे सुरू राहिली. आई-मुलगी, नणंद-भावजय, जाऊबाई, मैत्रिणी, सोसायटील महिला वर्ग अशा सगळ्यांनी एकत्र जाऊन ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा आस्वाद घेतला आहे. नात्यांची योग्य गुंफण यातूनच या चित्रपटाला तुफान यश मिळालं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Whats_app_banner