BAFTA Awards 2024 Updates: दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रेक्षक 'बाफ्टा' पुरस्कारांची लगबग सुरू झाली आहे. जगभरातील चाहते आणि कलाकार खूप उत्सुक आहेत. 'बाफ्टा' पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर यंदा प्रेक्षकांना त्यांच्या लाडक्या स्टार्सची झलक पाहायला मिळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हॉलिवूड स्टार रॉबर्ट डी नीरो, पॉल मेस्कल, रायन गोस्लिंग आणि मार्गोट रॉबीसारखे कलाकार या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. ‘बाफ्टा पुरस्कार २०२४’ कधी आणि कुठे पार पडणार? जाणून घेऊया...
सध्या बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत वेगवेगळ्या पुरस्कारांची धूम पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षी गेल्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. 'गोल्डन ग्लोब', 'क्रिटिक चॉईस' ते 'प्राइमटाइम एमी' यांसारख्या पुरस्कार सोहळ्यांतून अनेक चित्रपटांनी आणि जगभरातील कलाकारांनी यापूर्वीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता सर्वांच्या नजरा मनोरंजन विश्वातील प्रतिष्ठित 'ब्रिटिश अकादमी फिल्म अवॉर्ड्स' म्हणजेच 'बाफ्टा'वर खिळल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येत्या १८ फेब्रुवारी २०२४ रोजी लायन्सगेट प्लेवर ७७व्या बाफ्टा पुरस्कारांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
यंदाच्या ७७व्या बाफ्टा २०२४ पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेते डेव्हिड टेनंट करणार आहेत. हॉलिवूड अभिनेते डेव्हिड टेनंट त्यांच्या विनोदी आणि मनोरंजक शैलीसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. डेव्हिड टेनंट त्यांच्या रंजक सूत्रसंचालनाने '७७व्या बाफ्टा' पुरस्कार सोहळ्यात आकर्षण वाढवणार आहेत.
७७व्या बाफ्टा पुरस्कारांची यादी १८ जानेवारी २०२४ रोजी जाहीर झाली आहे. या यादीत ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित 'ओपनहायमर' या चित्रपटाने सर्वाधिक नामांकने मिळवली आहे. सध्या हा चित्रपट आघाडीवर आहे. 'ओपनहायमर' या चित्रपटाला सर्वाधिक १३ श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. 'बार्बी' चित्रपटातील अभिनेत्री मार्गॉट रॉबी हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले आहे. 'बार्बी' चित्रपटाला पाच नामांकने मिळाली आहेत. तर, ‘पुअर थिंग्ज’ला ११ नामांकन मिळाली आहेत. 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून' आणि 'द झोन ऑफ इंटरेस्ट' यांना प्रत्येकी ९ नामांकन मिळाली आहेत. ‘मॅस्ट्रो’साठी ब्रॅडली कूपर, ‘रस्टिन’साठी कोलमन डोमिंगो, 'द हँडओव्हर्स'साठी पॉल गियामट्टी, ‘सॉल्टबर्न’साठी बॅरी केओघन, 'ओपेनहायमर'साठी सिलियन मर्फी आणि 'पास्ट लाइव्ह्स'साठी तू यू यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले आहे. आता '७७व्या बाफ्टा' पुरस्कारांमध्ये कोणाला किती पुरस्कार मिळतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
संबंधित बातम्या