Badlapur School Case : बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. मंगळवारी या घटनेविरोधात बदलापूरमधील नागरिकांनी आंदोलन केले. संतप्त जमावाने बदलापूर स्थानकात रेल्वे रोको आंदोलनही केले. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीमधूनही या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
चिमुरडींवरील अत्याचाराने सगळेच हादरले आहेत. मराठी अभिनेत्री शिवाली परबने इन्स्टाग्रामवर आपल्या स्टोरीमध्ये या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. बलात्काऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी शिवालीने केली आहे.
अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला “माझं रक्त खवळतंय, आता ही कोणा एकाची लढाई नाहीये. याठिकाणी स्त्रिया व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे” असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.
मराठी अभिनेत्री सुरभी भावे हिनेदेखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. सुरभीने इन्स्टाग्राम स्टोरीमधून एक पोस्ट शेअर केली आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "बदलापूरमध्ये साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर त्यांच्या शाळेत लैंगिक अत्याचार...एका मुलीची आई म्हणून दररोज जीव टांगणीला लागेल असा प्रसंग!! माणुसकीचा अंत होत आहे हे निश्चित...त्या पालकांवर काय प्रसंग ओढवला असेल याची कल्पना सुद्धा करवत नाहीये...कधी अश्या आरोपींना डायरेक्ट मृत्यूची शिक्षा होईल या देशात देव जाणे."
अभिजीत केळकरने याप्रकरणी, “जे कृत्यच पाशवी, अमानवी आहे… त्याला शिक्षा तरी मानवी का असावी?" असा प्रश्न अभिजीत केळकरने उपस्थित केला आहे.
वाचा: कायद्याचं राज्य म्हणायचं आणि दुसरीकडे...; बदलापूर घटनेवरून राज ठाकरेंचा संताप, मनसैनिकांना केलं खास आवाहन
बदलापूर मधील नामांकित शाळेत १२ ऑगस्ट रोजी दोन लहान मुलींवर अत्याचार झाला होता. या प्रकरणातील आरोपी शाळेत १ ऑगस्ट रोजी कामावर कंत्राटी पद्धतीनं रुजू झाला होता. आरोपी अक्षय शिंदे यानं लहान मुलींचं लैंगिक शोषण केल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्याच्याकडे लहान मुलींना स्वच्छतागृहात नेण्याची जबाबदारी होती. या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनानं माफीनामा सादर केला असून मुख्याध्यापकांसह चार जणांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे.