Audience Angry On Appi Aamchi Collector : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेमध्ये सध्या एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अमोलच्या आजारपणामुळे ही कथा आता एक वेगळंच वळण घेताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेतील मुख्य पात्र अर्थात अप्पीचा एक मोठा अपघात झाल्याचे दाखवण्यात आले होते. या अपघातानंतर अर्जुन देखील शोकमग्न झालेला. एकीकडे अप्पीचा मृतदेह सापडला नसल्याने, ती जीवंत आहे, असे अर्जुनला वाटत होते. तर, अप्पी आणि अर्जुनचा मुलगा जो आताच मृत्यूच्या दारातून परतला आहे, त्याला देखील आपली आई परत येईल अशी आशा आहे. या दरम्यान आता अप्पी पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात परतणार आहे. मात्र, यासाठी मालिकेत आलेला ट्विस्ट पाहून प्रेक्षक संतापले आहेत.
या मालिकेच्या नव्या ट्रॅकमध्ये दाखवण्यात आले आहे की, अर्जुन अप्पीच्या शोधात नरसोबाच्या वाडीला जातो. तिथे एका वडापावच्या गाडीवर त्याला एका मुलीची झलक दिसते, जी अगदी हुबेहूब अप्पीसारखी दिसते. यावेळी अर्जुनला वाटतं की, कदाचित ही आपलीच अप्पी असावी. मात्र, ही अप्पी नसून दीपा आहे. तिला पाहून अर्जुन म्हणतो की, 'अप्पे तू या जगात नाही हे मान्य कर असं लोक म्हणतायत. पण नक्की कशाकशातून काढू तुला? माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात फक्त तू आहेस, या वस्तू आणि गोष्टी मला ओरडून सांगत आहेत की, अर्जुन जा आणि अप्पीला घेऊन ये.' यानंतर अर्जुन दीपाला भेटून, तिला अमोलसाठी अप्पीच्या रूपात घरी येण्याची विनंती करतो. दीपाने हे स्वीकारल्यास ती अप्पीच्या रूपात कुटुंबाच्या प्रश्नांचा सामना कसा करेल, हे आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
मात्र, या टीव्ही मालिकेच्या नवीन ट्विस्टवर काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या कमेंट दिसून येत आहेत, ज्या या बदलावर तिखट प्रतिक्रिया देणाऱ्या दिसत आहेत. 'पुन्हा एकदा परकर पोलकेवाली नायिका', 'केले चालू डबल रोल आता', 'एका ऑफिसरला वडे तळताना बघायचेच बाकी होते आता?', 'अरे किती वेळा तुम्ही दोघे हरवणार आहात?', 'बंद करा ही मालिका' अशा प्रतिक्रिया या मालिकेच्या प्रोमोंवर पाहायला मिळत आहेत. लोक मालिकेतील या ट्विस्टवर वैतागले आहेत. लागोपाठ तीन ट्विस्ट दाखवल्याने सगळाच सावळा गोंधळ झाल्याचे प्रेक्षक म्हणत आहेत.
तरीही, ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेने नेहमीच वेगवेगळ्या ट्विस्टने प्रसिद्धी मिळवली आहे, आणि आता प्रेक्षकांना आणखी एक नवं वळण पाहायला मिळणार आहे. आता मालिकेत पुढे कशा प्रकारे दीपाची भूमिका आणि अर्जुन करत असलेला अप्पीचा शोध कसा रंगवला जातो, हे पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
संबंधित बातम्या