Atul Parchure Died: मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून अभिनयाची छाप सोडणारा अष्टपैलू अभिनेता अतुल परचुरेचे १४ ऑक्टोबर रोजी निधन झाले आहे. गेल्या पाच सहा दिवसांपासून अतुल परचुरेंची प्रकृती खालावली होती. वयाच्या ५७व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. अतुल यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. आज मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये परचुरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, अभिनेत्री निवेदीता सराफ यांना अश्रू अनावर झाले आहेत.
मुंबईतील शिवाजी पार्क येथील दादर हिंदू स्मशानभूमीत अतुल परचुरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या कुटुंबीयांसोबतच कलाविश्वातील कलाकारही आले होते. अभिनेत्री निवेदीता सराफ देखील यावेळी हजर होत्या. अतुल यांचे शेवटचे दर्शन घेताना निवेदीता यांना अश्रू अनावर झाले आहेत. निवेदिता यांच्याबरोबरच वंदना गुप्ते, सविता मालपेकर या कलाकारांनाही अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले.
निवेदीता यांना इट्स मज्जाशी बोलताना मनातील भावना व्यक्त केल्या. “मी काय बोलू हे मला कळत नाही आहे. माझा खूप चांगला मित्र गेला. आमच्या दोघांच्या करिअरची सुरुवात एकत्र झाली होती. तो लढवय्या होता. इतक्या मोठ्या आजाराशी त्याने झुंज दिली. त्यातून तो बरा झाला आणि त्याने कार्यक्रम केला. अशाप्रकारचे रोल्स आता कोणी करु शकणार नाही असं मला वाटतं. शेवटी गणपतराव परचुरेंचा नातू होता” असे निवेदीता म्हणाल्या.
वाचा: 'तुझ्यासारखा पु.लं होणे नाही', अतुल परचुरेंच्या निधनाने हळहळली सिनेसृष्टी
पुढे त्या म्हणाल्या की, “अजूनही मला विश्वास बसत नाही आहे की अतुल आपल्यात नाही आहे. गेली २०-२५ दिवस तो खूप आजारी होता. त्याची अवस्था वाईट झाली होती पण कधी असं होईल असं वाटलं नव्हतं. कारण या आधीच्या आजारातून तो बाहेर पडला होता. त्याची इच्छाशक्ती खूप स्ट्रॉंग होती. माझं तर वैयक्तिक नुकसान झालं आहे कारण माझा खूप चांगला मित्र मी गमावला आहे. त्याहीपेक्षा अगदी नाट्यसृष्टी, टेलिव्हिजन सृष्टी, चित्रपटसृष्टी या सगळ्याच खूप मोठं नुकसान झालं आहे. इतका छान आणि हरहुन्नरी कलाकार आपल्यातून गेला.”