Atul Parchure Funeral Video : हिंदी-मराठी मनोरंजन विश्वात आपल्या दमदार अभिनयाने हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेता अतुल परचुरे यांनी सोमवारी (१४ ऑक्टोबर) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज (१५ ऑक्टोबर) शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार पोहोचले होते. या दरम्यानचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये आपल्या लाडक्या मित्राला निरोप देताना कलाकार भावूक झाल्याचे दिसले आहेत.
अतुल परचुरे यांच्या आकास्मित निधनामुळे प्रत्येकजण दु:खी आणि अस्वस्थ झाले आहे. १४ ऑक्टोबर रोजी रात्री अतुलने या जगाचा कायमचा निरोप घेतला. अतुल यांच्या निधनावर अनेक स्टार्स आणि बड्या व्यक्तींनी शोक व्यक्त केला. आज अतुल परचुरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यादरम्यान अतुल यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक सेलेब्स स्मशानभूमीपर्यंत पोहोचले होते. यावेळी अनेकांना आपले अश्रू आवरणं कठीण झालं होतं. प्रत्येकाच्या मनात त्यांच्या आठवणी दाटून आल्या होत्या.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये अतुल परचुरे यांच्या अंतिम दर्शनासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी राज ठाकरे पोहोचल्याचे दिसत आहेत. यावेळी राज ठाकरे यांच्या चेहऱ्यावर देखील अतीव दुःख दिसत होते.अतुल परचुरे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रिया बापटही दाखल झाले होते. त्यांचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर दुःखद भाव असून, सर्वजण अतुल यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करताना दिसले. अभिनेता महेश मांजरेकरही अतुलच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचले होते.
अतुल परचुरे यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या या अचानक एक्झिटमुळे मनोरंजन विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अतुल परचुरे यांच्यासोबत काम केलेल्या प्रत्येक कलाकाराने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तर, त्यांचे इंडस्ट्रीतील जवळचे मित्र देखील अंत्यसंस्काराला पोहोचले होते. यावेळी अभिनेत्री चिन्मयी सुमित, निवेदिता सराफ, सुचित्रा बांदेकर, सुमित राघवन, संजय नार्वेकर, श्रेयस तळपदे, पुष्कर श्रोत्री या कलाकारांना आपले अश्रू आवरता येत नव्हते. प्रत्येकाच्या मनात अतुल परचुरे यांच्या आठवणी दाटून आल्या होत्या.