Atul Parchure Funeral : मोठा पडदा असो, वा छोटा पडदा आणि रंगभूमी, प्रत्येक ठिकाणी आपल्या दमदार अभिनयाने आणि विविध पात्रांद्वारे लोकांना हसवणारे अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे. काही वर्षांपूर्वी त्यांना कर्करोग झाला होता. आता त्यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोमवारी सायंकाळी अतुल परचुरे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (आज) सकाळी ११ वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
टेलिव्हिजन आणि अनेक चित्रपटांमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाने लोकांचे मनोरंजन करणारे अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाच्या वृत्ताने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. सध्या, त्यांच्यामृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. परंतु, अभिनेते आणि कॉमेडियन अतुल दीर्घकाळापासून कर्करोगाशी लढा देत होते. त्यांना अनेक वर्षांपूर्वी कर्करोग झाला होता, त्यावर उपचार देखील सुरू होते. अभिनेते अतुल परचुरे यांनी वयाच्या अवघ्या ५७व्या वर्षी, १४ ऑक्टोबर रोजी अखेरच श्वास घेतला. अतुल यांनी आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. एक वर्ष आधीच अतुल यांनी आपण कर्करोगावर मात केली असल्याचे म्हटले होते.
गेल्या वर्षी एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अतुल यांनी, डॉक्टरांना गेल्या वर्षी आपल्या यकृतामध्ये ५ सेमी ट्यूमर आढळून आल्याचा खुलासा केला होता. अतुलने मुलाखतीत सांगितले होते की, हे ऐकल्यानंतर त्यांनी डॉक्टरांना एकच प्रश्न विचारला होता, तो म्हणजे मी यातून बरा होईन का? यावर डॉक्टरांनी त्यांना होकारार्थी उत्तर दिले होते.
याच मुलाखतीत अतुल यांनी एक मोठा खुलासा केला होता की, आपल्याला या दरम्यान जे उपचार मिळाले, ते चुकीचे होते. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. अतुल म्हणाले, 'उपचारानंतर माझे यकृत खराब झाले आणि मला त्रास होऊ लागला. चुकीच्या उपचाराने प्रकृती बिघडली. मला चालताही येत नव्हते. बोलता बोलता अडखळायला लागलो होतो.’ मात्र, आपल्या जिद्दीने त्यांनी यावरही मात केली होती. अतुल परचुरे पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात सक्रिय झाले होते. आजारपणातही त्यांच्यातील कलाकार त्यांना शांत बसू देत नव्हता.
संबंधित बातम्या