लाखो रुपये खर्च करून घेतले होते उपचार; कॅन्सरमुळे अतुल परचुरे झाले होते बेजार! मित्रांनी पुढे केलेला मदतीचा हात
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  लाखो रुपये खर्च करून घेतले होते उपचार; कॅन्सरमुळे अतुल परचुरे झाले होते बेजार! मित्रांनी पुढे केलेला मदतीचा हात

लाखो रुपये खर्च करून घेतले होते उपचार; कॅन्सरमुळे अतुल परचुरे झाले होते बेजार! मित्रांनी पुढे केलेला मदतीचा हात

Published Oct 15, 2024 08:38 AM IST

Atul Parchure Death: अतुल परचुरे इतके जिद्दी होते की, त्यांनी कर्करोगावर देखील मात केली होती. सगळं काही पुन्हा एकदा पूर्वस्थितीत येत असताना, अचानक ५७व्या वर्षात त्यांची ही अशी एक्झिट सगळ्यांनाच चटका लावून गेली आहे.

Atul Parchure Death
Atul Parchure Death

Atul Parchure Death : आपल्या दमदार अभिनयाने मराठीच नव्हे, तर हिंदी मनोरंजन विश्वालाही भुरळ घालणारे अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाले. अतुल यांच्या निधनामुळे अवघ्या मनोरंजन विश्वावर आणि त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. नाटक असो वा चित्रपट किंवा मालिका, अतुल परचुरे नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घ्यायचे. पडद्यावर जसे ते हसते-खेळते होते, तसेच ते त्यांच्या खऱ्या आयुष्यात देखील नेहमीच खूप हसरे होते. मात्र, कर्करोगासारख्या आजाराने या हरहुन्नरी अभिनेत्याला बेजार करून सोडले. परंतु, अतुल परचुरे इतके जिद्दी होते की, त्यांनी कर्करोगावर देखील मात केली होती. सगळं काही पुन्हा एकदा पूर्वस्थितीत येत असताना, अचानक ५७व्या वर्षात त्यांची ही अशी एक्झिट सगळ्यांनाच चटका लावून गेली आहे.

अतुल परचुरे आणि त्यांची पत्नी सोनिया यांच्या लग्नाचा २५वा वाढदिवस साजरा करत असतानाच त्यांना त्यांच्या आजाराची जाणीव झाली होती. लग्नाचा वाढदिवस साजरा करायला परदेशी गेलेल्या अतुल परचुरे यांना भारतात परतताच मोठा धक्का बसला होता. जेवणाची इच्छाच होत नसल्याने, त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन अनेक उपचार पद्धती करून पाहिल्या. या दरम्यान केलेल्या तपासणीत त्यांच्या लिव्हरमध्ये गाठ असल्याचे निदान झाले. पुढे हीच गाठ कर्करोगाची असल्याचे समोर आले. यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली. मात्र, या शस्त्रक्रियेत झालेल्या चुकीमुळे अतुल यांची प्रकृती आणखी खालावत गेली होती.

Atul Parchure: अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन, वयाच्या ५७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

गरज पडली तर ५० लाख उभे करू...

या कर्करोगासारख्या गंभीर आजारावर उपचार करत असताना अतुल परचुरे यांना खूप पैसा खर्च करावा लागत होता. एकीकडे त्यांचं शरीर या उपचारांना प्रतिसाद देत नव्हतं. यामुळे अतुल परचुरे बेजार झाले होते. गाठी साठलेला पैसा देखील औषधांवर खर्च झाला होता. त्यावेळी मात्र, अतुल परचुरे यांच्या मदतीला त्यांचा मनोरंजन विश्वातील परिवार धावून आला. ‘तुझ्याकडे आमचे फोन नंबर आहेत. कधीही गरज लागली तर फक्त एक फोन किंवा मेसेज कर. आकडा नाही सांगितलास तरी चालेल. गरज असेल तर २५ काय ५० लाख उभे करू. तू काळजी करू नकोस’, असे त्यांना अनेक मित्रांनी सांगितले.

आपल्या एका मुलाखतीत याविषयी बोलताना अतुल परचुरे म्हणाले होते की, ‘मी एक ओळखीचा चेहरा आहे, आणि इतकं काम करूनही आज अशी परिस्थिती आहे. तर, सामान्य माणसाचं काय होत असेल? इतकी वर्ष इंडस्ट्रीत काम करताना मी माणसं जोडली, याचं आज मला मनापासून समाधान वाटतं. पण मी हे आवर्जून सांगेन की, प्रत्येक व्यक्तीने आपला मेडिक्लेम करायलाच हवा. भले वर्ष २५-५० हजार जातील. पण तो कधीही तुमच्या कामी येईल.’

Whats_app_banner