मराठी चित्रपटसृष्टीमधील काही सिनेमे असे आहेत जे प्रदर्शित होऊन अनेक वर्ष उलटली असली तरी प्रेक्षक ते आजही आवडीने पाहताना दिसत आहेत. या चित्रपटांमध्ये ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘मुंबई-पुणे-मुंबई २’, ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘ती सध्या काय करते’ , 'दुनियादारी', 'टाइमपास' अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. आता या चित्रपटांमधील 'प्रेमाची गोष्ट' सिनेमाचा पुढचा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आले आहे.
प्रेमाचे नशीब, नशीबातील प्रेम बदलणारी एक नवीन गोष्ट ‘प्रेमाची गोष्ट २’ मध्ये पाहायला मिळणार आहे. प्रेम कधी-कधी नशिबाशी खेळतं आणि कधी नशीब प्रेमाला नव्या वाटेवर घेऊन जातं, या संकल्पनेवर आधारित ही प्रेमकथा आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना नात्यांचा रंजक प्रवास पाहायला मिळेल.
दिग्दर्शक सतीश राजवाडे आता ‘प्रेमाची गोष्ट २’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. त्यांनी आतापर्यंत, ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘मुंबई-पुणे-मुंबई २’, ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’, ‘प्रेमाची गोष्ट’, आणि ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटांतून प्रेमाच्या अनेक छटा दाखवल्या आहेत. ‘मुंबई-पुणे-मुंबई’ची कथा केवळ तरुण तरुणी भोवती फिरणारी होती. तर ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ कोणत्याही सिक्वेलसारखा नसलेला कथा पुढे नेणारा एक चित्रपट होता आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ यातही एक अनोखा दृष्टीकोन पाहायला मिळाला. सतीश राजवाडे यांच्या ’प्रेमाची गोष्ट’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड पसंती मिळाली. दोन घटस्फोटीत व्यक्ती पुन्हा प्रेमात पडण्याची ही भावनिक कहाणी होती. या सगळ्या चित्रपटांनंतर आता ‘प्रेमाची गोष्ट २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे नाविन्य म्हणजे यात व्हीएफएक्स आणि प्रेमकथेचे अनोखे मिश्रण अनुभवायला मिळणार आहे.
वाचा: गोविंदाच्या या चित्रपटाचा अनोखा विक्रम, कथा लिहिण्यापूर्वी शूट करण्यात आली गाणी
‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून निर्माते संजय छाब्रिया आहेत. 'प्रेमाची गोष्ट २' येत्या जून २०२५ मध्ये प्रदर्शित होईल. मात्र यातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात असल्याने हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. 'प्रेमाची गोष्ट' या चित्रपटात अतुल कुलकर्णी आणि सागरीका घाडगे हे कलाकार दिसले होते. आता नवे चेहरे असणार की पुन्हा हीच जोडी दिसणार हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
संबंधित बातम्या