दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असणारा पुष्पा २ हा सिनेमा आज ५ डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. पण हैदराबादमधील काही ठिकाणी या चित्रपटाचे ४ डिसेंबर रोजी रात्री प्रिमिअर ठेवण्यात आले होते. हैदराबादमधील एका प्रीमिअरचे रूपांतर गोंधळात झाले आहे. या प्रीमिअरला चाहत्यांनी इतकी गर्दी केली की चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच तिच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे.
बुधवारी रात्री आरटीसी चौकातील संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी पुष्पा २ हा सिनेमा पाहण्यासाठी तुफान गर्दी केली. या गर्दीमुळे थोड्या वेळातच चेंगराचेंगरी झाल्याचे पाहायला मिळाले. ज्यामुळे एक महिला आणि तिचे मूल कोसळले. मातृभूमीने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेता अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी थिएटरजवळ चेंगराचेंगरी परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये रेवती नावाच्या ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर तिचे मूल गंभीर जखमी झाले. कडक सुरक्षा आणि पोलिस संरक्षणासह अल्लू अर्जुनने हजेरी लावली होती. तरी देखील ही घटना घडली आहे.
रेवती असे या महिलेचे नाव असून ती दिलसुखनगर येथील रहिवासी आहे. ती पती भास्कर आणि त्यांच्या दोन मुलांसह अल्लू अर्जुन स्टारर चित्रपटाच्या स्क्रीनिंगला उपस्थित राहण्यासाठी आली होती. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अल्लू अर्जुन चाहत्यांना भेटण्यासाठी आला असता चित्रपटगृहाबाहेर गोंधळ उडाला. त्यामुळे उसळलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न पोलिस अधिकाऱ्यांनी केल्याने चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.
सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर अनेक व्हिडिओही समोर आले, ज्यात थिएटरजवळच्या अनागोंदी परिस्थितीची झलक पाहायला मिळाली. प्रचंड गर्दीत बेशुद्ध झालेल्या चिमुकल्याला घेऊन एक व्यक्ती धावत जाऊन मृतदेहाला सीपीआर देताना दिसला. या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिचा मृत्यू झाला. या गोंधळात चित्रपटगृहांचे मुख्य गेटही कोसळले, अशी माहिती देखील समोर येत आहे. अल्लू अर्जुन काही वेळातच परिसरातून बाहेर पडताना दिसला, त्याला कडक सुरक्षा आणि पोलिसांनी घेरले होते. त्याने गाडीच्या सनरूफवरून चाहत्यांना भेट दिली आणि वाहनांना पुढे जाण्यासाठी रस्ता तयार करण्याची विनंती केली.
वाचा: बॉलिवूडमधील 'हा' सिनेमा आहे छोटा राजनच्या जीवनावर आधारित? संजय दत्तने साकारली होती भूमिका
पुष्पा 2: द रूल हा सुकुमारच्या 2021 मध्ये आलेल्या पुष्पा : द राइज या चित्रपटाचा सिक्वेल आहे. अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद पुष्पा राज, श्रीवल्ली आणि भंवर सिंग शेकावत यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. मिथरी मूव्ही मेकर्स आणि सुकुमार रायटिंग्स या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. देवी श्री प्रसाद या चित्रपटाला संगीत देत आहेत. या आठवड्यात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग करेल अशी अपेक्षा आहे.
संबंधित बातम्या