Ashwini Kalsekar Birthday : मराठमोळ्या अभिनेत्री अश्विनी काळसेकर यांनी अभिनय क्षेत्रात आपली अनोखी ओळख निर्माण केली आहे. दोन दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी मराठी आणि हिंदी सिनेविश्वात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. एकता कपूरच्या लोकप्रिय ‘कसम से’ मालिकेत नकारात्मक भूमिका साकारून अश्विनींना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये विविध भूमिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला आहे.
अश्विनी काळसेकर यांचा अभिनयाच्या दुनियेत प्रवेश हा एक संघर्षपूर्ण अनुभव होता. त्यांनी आपल्या करिअरमध्ये काम करत असताना अनेक आव्हानांना तोंड दिलं. परंतु त्या नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे जात राहिल्या. यातीलच एक मोठा आव्हान होतं, त्यांना आई होण्याचं स्वप्न. अश्विनी यांनी मुलं न होण्याबद्दल एक मुलाखतीत उघडपणे बोलताना सांगितलं की, 'खरं तर आम्ही बाळासाठी खूप प्रयत्न केले. पण मला किडनीची समस्या आहे. त्यावेळी सरोगसीची फॅशन नव्हती आणि आमच्याकडे तेवढे पैसेही नव्हते. आम्ही संघर्ष करत होतो, प्रयत्न करत होतो. त्यानंतर एक वेळ अशी आली की डॉक्टर म्हणाले, तुझी किडनी भार उचलू शकत नाही. तर यामुळे एकतर तुझ्यावर त्याचे नकारात्मक परिणाम होतील किंवा बाळावर होतील.'
अश्विनी काळसेकर यांनी आपल्या मुलं नसण्याबद्दल बोलताना, आपल्याला वाईट वाटतं असं म्हटलं. तरीही त्या म्हणाल्या की, 'मला जे हवं होतं ते नाही मिळू शकलं. सगळी नशिबाची गोष्ट आहे. वाईट वाटतं. कारण मी पारंपरिक विचारांची आहे, त्यामुळे मला बाईपणाचं एक पूर्ण वर्तुळ जगायचं होतं, पण ते नाही होऊ शकलं.' अश्विनी यांनी आपल्या नशिबाची स्वीकृती केली असून, त्यांच्या जीवनात एक महत्वाची भूमिका त्यांचे सासू-सासे आणि आई-वडील आहेत, ज्यांची सेवा करून त्या त्यांच्या जीवनाचे उद्दीष्ट साधतात.
मुलं नसल्याने अश्विनींनी दोन श्वान पाळले आहेत. त्या म्हणाल्या की, ते श्वान आमच्या मुलांसारखे आहेत. त्यांच्यासाठी एक नॅनी ठेवली आहे, जी त्यांची काळजी घेते. अश्विनी काळसेकर यांनी हे दाखवून दिलं की, आयुष्यात वेगळ्या मार्गांनीही सुख आणि समाधान मिळवता येतं. अश्विनी काळसेकर यांचे करिअर यशस्वी असले तरी त्यांचं वैयक्तिक जीवन देखील लक्ष वेधून घेतं. २००९ मध्ये त्यांनी प्रसिद्ध अभिनेता मुरली शर्मा यांच्याशी दुसरं लग्न केलं. दोघेही सिनेविश्वात सक्रिय असून, मुरली शर्मा नुकतेच ‘देवरा: पार्ट 1’ मध्ये झळकले होते.
संबंधित बातम्या