मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण करणारे, विनोदी अभिनेते म्हणजे अशोक सराफ. आपल्या अभिनयातून प्रेक्षकाना खळखळून हसायला भाग पाडणाऱ्या अशोक सराफ यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सतत त्यांच्या विषयी किंवा त्यांच्या आगामी प्रोजेक्ट विषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. आता अशोक मामा मालिका विश्वात कमबॅक करत असल्याचे पाहायला मिळणार आहे. त्यांची एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.
"येतोय 'महाराष्ट्राचा महानायक' लवकरच", असं म्हणत 'कलर्स मराठी'ने मालिकेची पहिली झलक दाखवली होती. त्यामुळे या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण झालं होतं. आता मालिकेचा पहिला प्रोमो आऊट करत प्रेक्षकांना एक खास सरप्राईज देण्यात आलं आहे. अशोक सराफ यांच्या पहिल्या मालिकेचे नाव 'अशोक मा.मा' असे आहे. या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामा छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
नुकताच 'अशोक मा.मा.' या मालिकेचा उत्कंठा वाढवणारा प्रोमो कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. प्रोमो पाहताक्षणी काहीतर गूढ, थरारक असल्याचं जाणवतंय. प्रत्येक गोष्टीची खबरदारी घेणारे, अत्यंत शिस्तप्रिय, काटेकोरपणे वागणारे अशोक मामा दिसत आहेत. तसेच 'शिस्त म्हणजे शिस्त' हा त्यांच्या आयुष्याचा फंडा असल्याचं प्रोमोमध्ये स्पष्ट होत आहे. पण त्यांच्या मिश्कील अंदाजाने सर्वांच्या चेहऱ्यावर ते हसू आणणार आहेत. प्रोमोतील शेवटच्या फ्रेममध्ये दारावर लावलेल्या नेम प्लेटमध्ये 'अशोक मा.मा.' असं दिसत आहे. एकंदरीतच अशोक मामा आणि मालिकेतील त्यांच्या पात्राचं नाव सारखंच आहे.
'अशोक मा.मा.' या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. मालिकेत नक्की काय पाहायला मिळणार याबाबतची प्रेक्षकांची उत्कंठा आता वाढली आहे. तसेच अशोक मामांसह आणखी कोणते कलाकार मालिकेत झळकणार? मालिका कधीपासून सुरू होणार या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.
वाचा: 'लाफ्टर शेफ'च्या सेटवर रीम शेखनंतर राहुल वैद्यचा अपघात, चेहऱ्यावर आली आग
'अशोक मा.मा.' मालिकेबद्दल बोलताना अशोक मामा म्हणाले, "मालिका खूपच मनोरंजक आहे. चिन्मय मांडलेकरने या मालिकेची कथा खूप चांगल्या पद्धतीने लिहिली आहे. 'टन टना टन' या मालिकेनंतर अनेक वर्षांनी पुन्हा 'कलर्स मराठी' वाहिनीच्या माध्यमातून मी टेलिव्हिजनवर कमबॅक करतोय. शूटिंग करताना खूप मजा येतेय. प्रेक्षकांनाही ही मालिका नक्कीच आवडेल".