Marathi Movie Interesting Kissa : मराठी मनोरंजन विश्वात असे अनेक चित्रपट बनले आहे, ज्यांनी एकाच नव्हे तर अनेक पिढ्यांचे भरपूर मनोरंजन केले. ८०-९०च्या दशकांत आलेल्या काही कल्ट चित्रपटांनी आजही प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे. अशाच गाजलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे 'धुमधडाका'. या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे या त्रिकूटाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाचे डायलॉग्स आणि गाणी देखील खूप गाजली होती. याच चित्रपटात एक असा डायलॉग होता जो प्रचंड गाजला. हा डायलॉग होता 'व्याख्या विख्खी वुख्खू'... पण हा डायलॉग मूळ स्क्रिप्टमध्ये नव्हता. अचानक कुठून आला? यामागे देखील एक किस्सा आहे.
८०-९०च्या काळातील चित्रपटांनी मराठी चित्रपट सृष्टीला एक वेगळी ओळख दिली. त्यांचे चित्रपट आजही प्रत्येक वयोगटाच्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. अशाच तुफान गाजलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट होता ‘धुमधडाका’. हा चित्रपट त्या काळातील एक अविस्मरणीय हिट चित्रपट ठरला होता. या चित्रपटातील कलाकारांचे अचूक टायमिंग, संवादांची विविधता आणि गोड विनोद प्रेक्षकांना आजही भरपूर हसवतात. विशेषत: अशोक सराफ यांच्या संवादांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्यांच्या या चित्रपटातील गाजलेल्या संवादांपैकी एक संवाद होता 'व्याख्या,विख्खी,वुख्खू'च्या मागे एक भन्नाट किस्सा आहे.
साधारणत: तीन शब्द असलेला हा संवाद तुफान गाजला होता. 'व्याख्या,विख्खी,वुख्खू' हे तीन शब्द, जे कधीच या चित्रपटाच्या स्क्रीप्टमध्ये नव्हते, ज्यांचा काहीही अर्थ नाही, त्यांनी तुफान प्रसिद्धी मिळवली. खरंतर हा संवाद कधीच त्यात नव्हता. अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत किस्सा सांगताना म्हटले की, 'धुमधडाका'मध्ये त्यांनी महेश कोठारे यांच्या मित्राची आणि वडिलांची दुहेरी भूमिका साकारली होती. एका दृश्यात, महेशचे वडील म्हणून धनाजी वाकडे यांच्या घराकडे जात असताना, अशोक सराफ त्या घरच्या माळीसारख्या दिसणाऱ्या माणसाला विचारतात की, 'मालक कुठे आहेत?' यावर तो माणूस 'मीच मालक आहे', असे उत्तर देतो. यावेळी गोंधळून गेलेल्या अशोक सराफ यांनी खोकला येत असल्याने थोडा खोकल्याचा आवाजात काढला, त्यातून निघाले हे तीन शब्द 'व्याख्या,विख्खी,वुख्खू', ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
'व्याख्या,विख्खी,वुख्खू' हे शब्द इतके लोकप्रिय होतील याची कधीच कल्पनाही त्यांना आली नव्हती. या संवादाने इतके यश मिळवले की, सोशल मीडियावर तरुणाईमध्ये तो ट्रेंड बनला. याच शब्दांवर आधारित टीशर्ट्स देखील बाजारात आले, ज्याने हे संवाद आणखी लोकप्रिय केले. ‘धुमधडाका’ आणि अशोक सराफ यांच्या अशा गमतीदार अभिनयाने त्यांचे प्रत्येक संवाद प्रेक्षकांच्या मनावर कायमचे छाप पाडून गेले.
संबंधित बातम्या