- (ashok saraf)आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना पोट धरून हसवणारे अशोक नेहमीच हटके भूमिकांमधून आपल्या भेटीला आले.
आपल्या विविधअंगी भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारे हरहुन्नरी आणि दिग्गज अभिनेते अशोक सराफ (ashok saraf) यांचं चाहत्यांच्या मनात अढळ स्थान आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना पोट धरून हसवणारे अशोक नेहमीच हटके भूमिकांमधून आपल्या भेटीला आले. गंभीर असो किंवा विनोदी त्यांनी प्रत्येक भूमिकेला न्याय दिला. मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये ओळख निर्माण करणारे अशोक यांनी नुकतीच आपल्या वयाची ७५ वर्ष पूर्ण केली. यासोबतच त्यांनी सिनेसृष्टीतील त्यांची ५० वर्ष पूर्ण केली. लवकरच ते सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमात अशोक मामा अनेक किस्से सांगताना दिसणार आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
काही आठवड्यांपूर्वीच 'कोण होणार करोडपती' चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिजनमध्ये कर्मवीर स्पेशल भाग दाखवण्यात येत आहेत. पहिल्या आठवड्यात कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री काजोल हिने तिच्या आईसोबत हजेरी लावली होती. तर दुसऱ्या कर्मवीरच्या भागात लोकप्रिय लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती यांनी हजेरी लावली होती. आता तिसऱ्या भागात अशोक मामा निवेदिता सराफ आणि त्यांचे भाऊ सुभाष सराफ यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत. आपल्या विनोदी शैलीत ते सचिन खेडेकर यांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसणार आहेत. त्यांनी जिंकलेली ही रक्कम पंढरपूर येथील एका एचआयव्ही ग्रस्त मुलांच्या संस्थेला देण्यात येणार आहे. प्रश्नांची उत्तरं देताना अशोक मामा काही अफलातून किस्से सांगताना दिसणार आहेत.
मामांना नाटकाची भयंकर आवड. मात्र वडिलांच्या इच्छेखातर ते बँकेत नोकरी करत होते. मात्र त्यातही त्यांची नाटकाची तालीम सुरू असे. नाटकाच्या तालमीला जाण्यासाठी त्यांनी अनेक कल्पना लढवल्या आहेत. बँकेत असताना नाटकाची तालीम चुकू नये यासाठी त्यांनी काही वेळेस खोटं वैद्यकीय प्रमाणपत्र बँकेत जमा केलं असल्याचा खुलासा मामा या कार्यक्रमात करणार आहेत. सोबतच प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्यासोबत आधी नाटकाची तालीम आणि त्यानंतर क्रिकेट खेळतानाचा किस्सा देखील ते या कार्यक्रमात सांगणार आहेत. हा भाग २५ जून रोजी प्रक्षेपित होणार आहे.