मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर प्राजक्ताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. प्राजक्ताच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. तसेच प्राजक्ताला काय आवडते आणि काय नाही आवडत? हे जाणून घेण्यात देखील चाहत्यांना रस असतो. आता प्राजक्ताला कोणता चित्रपट आवडतो हे समोर आले आहे.
नुकताच प्राजक्ताने तिचा 'तीन अडकून सीताराम' या चित्रपटाचे प्रोमोशन करताना एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिचा आवडता विनोदी चित्रपट कोणता? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर प्राजक्ताने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वाचा: यश आणि आरोहीमध्ये खुलणार प्रेम?
प्राजक्ताने उत्तर देत, “‘अशी ही बनवाबनवी’ हा माझा सर्वात आवडता विनोदी चित्रपट आहे. त्याबरोबरच ‘हेराफेरी’, ‘मालामाल विकली’ हे विनोदी चित्रपटही मला आवडतात. यासोबतच माझा पहिला चित्रपट ‘खो-खो’ हा देखील मला प्रचंड आवडतो. हा चित्रपट केदार शिंदेंनी ‘लोच्या झाला रे’ नाटकावरुन प्रेरणा घेऊन बनवला होता. त्याच्या मदतीला सात पूर्वज खाली येतात आणि ते आल्यामुळे त्याची किती गल्लत होते, अशी त्या चित्रपटाची कथा आहे. त्यामुळे हा चित्रपटही माझ्या सर्वात आवडता कॉमेडीपटांपैकी एक आहे.”
प्राजक्ताच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचा ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्राजक्तासोबत वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, अलोक राजवाडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. यापूर्वी प्राजक्ता ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या अनेक मालिकांतून घराघरात पोहोचली. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.