Ashadhi Ekadashi 2024: पंढरपूर वारी ही महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित वार्षिक धार्मिक यात्रा आहे. ही वारी म्हणजे असंख्य भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. दरवर्षी लाखो वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी ज्ञानेश्वर माऊली मार्गावरून पंढरपूरकडे निघतात. यंदा, या यात्रेचे विशेष कव्हरेज करण्याची संधी ‘झी टॉकीज’ने अमित रेकी या गुणी कलाकाराला दिली होती. या निमित्ताने त्याने देखील पहिल्यांदाच वारी अनुभवली आहे. यात त्याने वारी अनुभवण्यासोबतच २१ दिवस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील सांभाळले आहे.
वारीच्या या विशाल सोहळ्यात झी टॉकीज या वाहिनीच्या वतीने भक्तांसाठी खास उपक्रम राबवले गेले. यात एक भव्य चित्ररथ साकारण्यात आला होता. ज्यात १२ फुटांची विठोबा आणि रुक्मिणीची मूर्ती ठेवण्यात आली होती. या चित्ररथाने वारीच्या मार्गावर फिरत भक्तांना प्रत्यक्ष मंदिरात असल्याची अनुभूती करून दिली. त्याचप्रमाणे, यासोबत आणखी एक चित्ररथ चालत होता. यावर विठोबा-रुक्मिणीसाठी वस्त्र तयार होत होती, ज्यात वारकरी सुद्धा श्रमदान करताना दिसले. या अनोख्या उपक्रमामुळे भक्तांची श्रद्धा अधिक वृद्धिगंत झाली आहे.
वारीच्या प्रवासात अभिनेता अमित रेकी याने वारकऱ्यांच्या संघासह प्रवास केला. ‘वारी हा एक अद्वितीय अनुभव आहे. प्रत्येक पावलावर भक्तांचा उत्साह, श्रद्धा आणि प्रेम जाणवते,’ असे अमितने सांगितले. त्याने वारीच्या दरम्यान अनेक भक्तांच्या कथा ऐकल्या आणि त्यांच्या भावना सजीवपणे प्रेक्षकांसमोर मांडल्या.
वारीच्या ५व्या दिवशी अमित आणि त्यांच्या टीमने एका लहानशा गावात थांबण्याचा निर्णय घेतला होता. त्या रात्री, गावातील एक वृद्ध महिला, लक्ष्मीबाई, यांनी अमितला आपल्या घरात आमंत्रित केले. लक्ष्मीबाईंच्या कथेने अमितला भावूक केले. मोलमजुरी करणाऱ्या लक्ष्मीबाई गेली ४० वर्षे वारीत सहभागी होत आहेत. आधी त्या आपल्या नवऱ्याबरोबर यायच्या. मात्र, गेली ३ वर्षे त्या एकट्याच येत आहेत, कारण त्यांच्या नवऱ्याची शेवटची इच्छा होती की त्यांनी वारी कधीच चुकवायची नाही. लक्ष्मीबाईंनी सांगितले की, ‘प्रत्येक वारीत मला विठोबाची एक वेगळी अनुभूती मिळते.’
अमितने आपल्या अनुभवाचे वर्णन करताना सांगितले की, ‘ही वारी माझ्यासाठी एक जीवन बदलणारा अनुभव ठरली आहे. भक्तांच्या श्रद्धेने मला प्रेरणा दिली आहे आणि त्यांच्या कथांनी माझ्या हृदयाला स्पर्श केला आहे.’ अमित रेकी याने पंढरपूर वारीच्या कव्हरेजमध्ये नवीन उंची गाठली आहे. त्यांच्या सजीव सादरीकरणाने आणि भक्तांच्या कथांनी प्रेक्षकांना वारीचा अद्वितीय अनुभव मिळवून दिला आहे.
संबंधित बातम्या