बॉलिवूडमधील कॉमेडी आणि गंभीर भूमिका करणारा अभिनेता म्हणून अरशद वारसी ओळखला जातो. तो सतत त्याच्या भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकताना दिसतो. सध्या अरशदच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. अरशद हा लवकरच पुन्हा लग्नबंधनात अडकणार आहे. आता अरशद कोणाशी लग्न करतोय? कधी करतोय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
अरशद वारसी हा पत्नी मारीया गोरेट्टीशी पुन्हा लग्न करणार आहे. १४ फेब्रुवारी १९९९ साली अरशदने मारीयाशी चर्चमध्ये जाऊन पारंपरिक पद्धतीने लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला जवळपास २५ वर्षे पूर्ण होत आहे. पण त्यांनी अद्याप कायदेशीरपण विवाह केलेला नाही. त्यामुळे लग्नाच्या २५व्या वाढदिवशी अरशदने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तो कोर्टात रजिस्टर पद्धतीने लग्न करणार आहे.
वाचा: अभिनेता विद्युत जामवालाला पोलिसांनी केली अटक, काय आहे प्रकरण?
अरशदने नुकताच 'टाइम्स ऑफ इंडिया'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने इतक्या वर्षांनंतर रजिस्टर पद्धतीने लग्न करण्यामागचे कारण सांगितले आहे. 'आमच्या डोक्यात बराच वेळा हा विचार आला होता पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा नव्हता. पण जेव्हा संपत्तीशी संबंधीत आणि इतर काही गोष्टी करताना लागणाऱ्या कागद पत्रांच्या वेळी आमच्या ही गोष्ट लक्षात आली. आम्ही फक्त कायद्यासाठी हे करत आहोत. नाहीतर एक सोबती म्हणून जर तुम्ही एकमेकांना कमिटमेंट दिली असेल तर इतर गोष्टी महत्त्वाच्या ठरत नाहीत' असे अरशद म्हणाला.
पुढे मुलाखतीमध्ये त्याने लग्नाला २५ वर्षे पूर्ण होत असल्याचे सांगत म्हटले, 'आमचे केवळ हॅप्पी मॅरिड लाइफ नसून यशस्वी मॅरिड लाइफ आहे. आमच्या आयुष्यातील ही २५ वर्षे अतिशय वेगळी होती. मारीया आणि मी अतिशय वेगळे आहोत. त्यामुळेच कदाचित आम्ही आज एकत्र आहोत. मारीया ही अतिशय तापट आहे आणि मी एकदम शांत. ती सुशिक्षित आहे आणि माझे फारसे शिक्षण झालेले नाही. तिच्या आयुष्यात फार मोजकी व्यक्ती आहेत आणि मी जिकडे जाईल तिकडचा होऊन जातो. या आणि इतर काही गोष्टींमुळेच कदाचित आम्ही आज एकत्र आहोत. तिचा वेडेपण आणि माझा शांत स्वभाव आम्हाला एकमेकांशी बांधून ठेवतो.'