Arshad Warsi on Prabhas: बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी सध्या त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आला आहे. नुकतीच त्याने साऊथचा सुपरस्टार प्रभासबद्दल वादग्रस्त कमेंट केली होती. त्यामुळे अर्शद वारसीला टीकेचा सामना करावा लागला होता. प्रभासनंतर त्याने हजबाबत कमेंट केली, ज्यानंतर मुस्लिम समाजातील लोकांनी त्याला खूप ट्रोल केले. अर्शद वारसी बऱ्याच दिवसांपासून ट्रोलिंगचा सामना करत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या अर्शदने आता मोठे पाऊल उचलले आहे.
स्वातंत्र्यदिनी अर्शद वारसीने आपल्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये अर्शदची पत्नी आणि मुलगी त्याच्यासोबत दिसत आहेत. अर्शदने प्रभासबद्दल केलेल्या कमेंटमुळे सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका झाली. प्रभासचे चाहते अर्शदवर इतके चिडले की, त्यांनी अर्शद आणि त्याच्या कुटुंबीयांच्या या फोटोवर नकारात्मक कमेंट करायला सुरुवात केली. अर्शद वारसीला प्रभासच्या चाहत्यांकडून खूप हेट कमेंट्स आल्या. लोकांनी त्याच्या मुली आणि पत्नीबद्दल असभ्य कमेंटही केल्या. यानंतर अभिनेत्याने एक मोठा निर्णय घेतला आहे.
जेव्हा अर्शद वारसीने पाहिले की, त्याच्या कुटुंबाला देखील सर्व प्रकारच्या वाईट कमेंट्सचा सामना करावा लागतो तेव्हा, त्याने या फोटोवरील कमेंट्स बंद केल्या. अर्शदने आता या फोटोवरील कमेंट्स काढून टाकल्या आहेत, त्यानंतर फोटोवर कोणत्याही कमेंट्स दिसत नाहीयेत. अर्शद वारसीच्या या पावलामुळे तो ट्रोलिंगवर खूप नाराज असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रभासवर टिप्पणी करणे अर्शदला इतके महागात पडले आहे की, आता त्याला सोशल मीडियावरही काही कडक पावलं उचलावी लागली आहेत.
काही दिवसांपूर्वी अर्शद वारसीने एका पॉडकास्टमध्ये प्रभासच्या 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटावर आपले मत मांडले होते. अभिनेत्याने पॉडकास्टमध्ये सांगितले की, त्याला हा चित्रपट आवडला नाही आणि प्रभासच्या पात्राबद्दल बोलताना त्याने म्हटले की, तो एक जोकर आहे. तो म्हणाला, ‘प्रभास, या चित्रपटात तो कसा होता हे पाहून मला वाईट वाटले. तो जोकरसारखा दिसत होता. मला 'मॅड मॅक्स' पहायचा होता, मला मेल गिब्सनला पाहायचे होते. यार, तू त्याचं काय केलंस? हे का असं का झालं असेल, तेच कळलं नाही.’