बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा चित्रपट प्रदर्शित झाल्या दिवसापासून चर्चेत आहे. या चित्रपटाविषयी अनेकांनी वेगवेगळी मते मांडली. काहींनी चित्रपटाचा सकारात्मक रिव्ह्यू दिला. तर काहींनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली. आता अभिनेता अर्शद वारसीने देखील चित्रपट पाहून प्रतिक्रिया दिली आहे. त्याने बिनधास्तपणे त्याचे मत मांडले आहे. त्याने चित्रपटातील डायलॉग, इंटिमेट सीन्स या सगळ्यावरच वक्तव्य केले आहे.
अर्शद वारसीने नुकताच 'बॉलिवूड हंगामा'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तो चित्रपटाविषयी म्हणाला, “कदाचित सर्व गंभीर कलाकारांना ‘ॲनिमल’ हा चित्रपट आवडणार नाही. पण मला तो चित्रपट खूप आवडला. हा चित्रपट म्हणजे जणू ‘किल बिल’चा पुरुषी व्हर्जन होता. माझा या चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे वेगळा आहे. मी चित्रपटांकडे फक्त मनोरंजनाच्या दृष्टीकोनातून पाहतो. त्यामुळे जेव्हा मी थिएटरमध्ये जातो तेव्हा मला असेच चित्रपट पहायला आवडतात. मला अधिक विचार करायचा नाही, मला काही शिकवू नका किंवा ज्ञान देऊ नका. हे सर्व मी शाळेत शिकलोच आहे. चित्रपट फक्त मनोरंजनाचा विषय आहे.”
वाचा: चाहत्याने मलायका अरोराच्या कंबरेवर हात ठेवला अन्... Video viral
पुढे तो म्हणाला, “अशा काही गोष्टी असतात, ज्या आपल्याला बघायला आवडतात पण करायला नाही. ‘ॲनिमल’सुद्धा माझ्यासाठी असाच चित्रपट आहे. जेव्हा इंद्र कुमार यांनी मला ‘ग्रँड मस्ती’सारखा चित्रपट करण्यासाठी कॉल केला होता, तेव्हा मी नकार दिला. कारण मला असे चित्रपट करायला आवडत नाहीत. मला सेक्स कॉमेडी आवडत नाही. याचा अर्थ असा नाही की ते मला पाहायलाही आवडत नाही. ते मनोरंजक असतात, पण मला त्यात काम करायला आवडत नाही. एक प्रेक्षक म्हणून मला असे चित्रपट पहायला आवडतील. पण एक अभिनेता म्हणून मी त्यात काम करू शकत नाही. मला पॉर्न बघायला आवडते, पण मी पॉर्न करू शकत नाही.”
'अॅनिमल' हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये सुरुवातीपासूनच उत्सुकता होती. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले आहे.
संबंधित बातम्या