Actor Sonu Sood Arrest Warrant : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. लुधियाना कोर्टाने सोनू सूदविरोधात फसवणुकीच्या प्रकरणात अटक वॉरंट जारी केले आहे. लुधियाना येथील वकील राजेश खन्ना यांनी दाखल केलेल्या खटल्यात मोहित शुक्ला नावाच्या व्यक्तीवर १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात सूदला समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र, सोनू हा कोर्टात गैरहजर राहिला होता. त्यामुळे त्याला हे अटक वॉरंट बजावण्यात आलं आहे.
१० लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी सोनू सूदला कोर्टात साक्ष देण्यासाठी वारंवार समन्स बजावण्यात आले होते. पण, तो एकदाही कोर्टात हजर राहिला नाही. त्यामुळे कोर्टाने त्याच्या अटकेसाठी वॉरंट जारी केलं आहे. लुधियाना येथील वकील खन्ना यांनी केलेल्या आरोपानुसार मोहित शुक्ला नामक व्यक्तीने त्याला बनावट रिझिका नाण्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले होते आणि सोनू या प्रकरणात साक्ष देणार होता. लुधियानाच्या न्यायदंडाधिकारी रमनप्रीत कौर यांनी हे वॉरंट जारी केले आहे. मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील ओशिवरा पोलिस ठाण्यात वॉरंट पाठवण्यात आले असून, अभिनेत्याला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशात म्हटले आहे की, "सोनू सूदला अनेकवेळा समन्स पाठवण्यात आले होते, ज्याची त्यालाही माहिती होती, परंतु तो हजर झाला नाही. सोनू एकदाही साक्ष देण्यासाठी कोर्टात आला नाही. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आता सोनूविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १० फेब्रुवारीरोजी होणार आहे. या प्रकरणी अभिनेता किंवा त्याच्या टीमकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
अभिनेता सोनू सुद या पूर्वी देखील अडचणीत आला आहे. त्याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तो चर्चेत राहिला आहे. आता, या प्रकरणी त्याच्यावर काय कारवाई होणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
संबंधित बातम्या