२२ जानेवारी रोजी आयोध्येतील राम मंदिराचा उद्धाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्यात आले. दिग्गजांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनीच प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हा अभिनेता सर्वसामान्यांच्या रांगेत उभे राहून प्रभू श्रीरामाचे दर्शन घेताना दिसत आहे.
राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठान सोहळ्याला काही मोजक्या बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. त्यानंतर २३ जानेवारी रोजी अभिनेते अनुपम खेर हे गुपचूप राम मंदिरात पोहोचले आणि प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. दरम्यान, अनुपम खेर यांनी चेहरा पूर्ण झाकला होता. त्यांनी तोंडाला मफलर गुंडाळले होते. तसेच डोक्यावर टोपी घातली होती. त्यांना या लूकमध्ये ओळखणे कठीण झाले आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: बार्बी ते ओपेनहायमर; 'या' चित्रपटांना मिळाले ऑस्करमध्ये नामांकन
अनुपम खेर यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर दर्शन घेतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला, "कृपया हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा. काल मी निमंत्रित पाहुणे म्हणून राम मंदिरात गेलो होतो! पण आज सगळ्यांसोबत शांतपणे मंदिरात जावंसे वाटले. असा भक्तीचा सागर पाहिला की, माझे मन प्रफुल्लित झाले. लोकांमध्ये प्रभू श्री रामजींच्या दर्शनाचा उत्साह आणि भक्ती दिसून येत होती.मी निघायला लागलो तेव्हा एका भक्ताने मला सांगितले, 'भाऊ, तोंड झाकले तरी काही होणार नाही! प्रभू श्री रामाने ओळखले आहे!” असे कॅप्शन दिले आहे.
अनुपम खेर यांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने "सर, तुम्ही आज मन जिंकले" असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने अनुपम खेर यांचे कौतुक करत "सर, तुमचा हा स्वभाव हृदयाला भिडतो आणि तुमच्याबद्दलचा आदर आणखीनच वाढतो" असे म्हटले आहे.