अभिनेता अन्नू कपूर यांना त्यांच्या 'हम दो हमारे बारा' या आगामी चित्रपटामुळे जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. मात्र या विषयी बोलताना अन्नू कपूर म्हणाले की, मी अशा जीवे मारण्याच्या धमक्यांना अजिबात घाबरत नाही. या सगळ्याची सुरुवात त्याच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या काही सोशल मीडिया कमेंट्सपासून झाली. यांनतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून सगळ्या प्रकरणाची माहिती पोलिसांना देऊन आपले कर्तव्य बजावले आहे. तर, पोलिसांकडे सुरक्षेची मागणी देखील केली आहे'.
या विषयी सांगताना अन्नू कपूर म्हणाले की, 'हम दो हमारे बारा'चे आमचे लेखक मुस्लीम आहेत आणि सध्याच्या परिस्थितीमुळे त्यांना देखील अधिक त्रास सहन करावा लागत आहे. मी तर पूर्णपणे नास्तिक आहे. जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे पोलिसांना महिला कलाकारांच्या घरी देखील जावे लागले आहे. काही धर्मांध सोशल मीडियावर निदर्शने करून द्वेष पसरवत आहेत. खबरदारी म्हणून आम्हाला पोलीस आणि न्यायालयाला हे कळवावं लागलं आहे.'
'हम दो हमारे बारा' हा चित्रपट एका अशा व्यक्तीभोवती फिरतो जो आपल्या धार्मिक श्रद्धेवर ठाम राहतो आणि गोष्टी त्याच्या हाताबाहेर जातात. तसेच, या चित्रपटातून लोकसंख्या नियंत्रणावर भाष्य केल्याचे बोलले जात आहे. याला धार्मिक दृष्टीकोन असल्याने सनसनाटी विषयांवर असे सिनेमे का बनवले जातात आणि प्रदर्शनाची वेळही निवडणुकीच्या आसपास का असते, असा प्रश्न अन्नू कपूर यांना विचारण्यात आला.
यावर उत्तर देताना ते म्हणाले की, ‘मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी चित्रपटसृष्टी आणि माझ्या सहकाऱ्यांचा आदर करून सांगतो की, मी चित्रपट, टीव्ही किंवा ओटीटी कंटेंट पाहत नाही. मी एक अज्ञानी व्यक्ती आहे. पैसे कमावण्यासाठी सिनेमात काम करणं हे माझं काम आहे. पण त्यासाठी मी चोरी करणार नाही किंवा बेकायदेशीर काम करणार नाही किंवा माझ्या देशाविरोधात काहीही काम करणार नाही. स्क्रिनिंग तर सोडाच, मी चित्रपटाचा टीझरही पाहिलेला नाही. ’ड्रीम गर्ल १' किंवा २ देखील मी पाहिलेली नाही. तसेच, या चित्रपटात कोणतेही राजकीय विधान करण्यात आलेले नाही.'
या अशा धमक्यांनी मी प्रभावित होत नाही आणि घाबरत मुळीच नाही, असे सांगून ते पुढे म्हणाले की, ‘या सर्व बैलांना मी घाबरत नाही. जेव्हा माझी या जगातून निघून जाण्याची वेळ येईल, तेव्हा कोणीही थांबू शकणार नाही आणि जोवर ती वेळ येत नाही, तोवर मला कोणीही यमसदनी पाठवू शकणार नाही. माझ्या सोशल मीडिया अकाऊंटवर अशा धमक्या आल्यावर माझी पत्नी थोडी घाबरली होती.’
संबंधित बातम्या