अन्नू कपूर यांना कोट्यवधींचा चुना; पैसे घेऊन सीए आणि गुंतवणूक सल्लागार फरार!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अन्नू कपूर यांना कोट्यवधींचा चुना; पैसे घेऊन सीए आणि गुंतवणूक सल्लागार फरार!

अन्नू कपूर यांना कोट्यवधींचा चुना; पैसे घेऊन सीए आणि गुंतवणूक सल्लागार फरार!

Mar 21, 2024 09:14 AM IST

ज्या कंपनीत अन्नू कपूर यांनी गुंतवणूक केली होती, त्या कंपनीचा सीए आणि गुंतवणूक सल्लागार अंबर दलाल शेकडो लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन फरार झाला आहे.

अन्नू कपूर यांना लागला कोट्यावधींचा चुना
अन्नू कपूर यांना लागला कोट्यावधींचा चुना

बॉलिवूड अभिनेता अन्नू कपूरसोबत (Annu Kapoor) मोठी फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अन्नू कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एका कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती. जवळपास दीड कोटी रुपये त्यांनी या कंपनीमध्ये गुंतवले होते. अन्नू कपूर आणि त्याचे कुटुंब अनेक वर्षांपासून या कंपनीच्या गुंतवणूक योजनेत पैसे गुंतवत होते. या बदल्यात अन्नू कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांना दरमहा काही रक्कम नफा म्हणून मिळत होती. मात्र, आता याच गुंतवणुकीत त्यांना तब्बल दीड कोटी रुपयांचा चुना लागला आहे. ज्या कंपनीत अन्नू कपूर यांनी गुंतवणूक केली होती, त्या कंपनीचा सीए आणि गुंतवणूक सल्लागार अंबर दलाल शेकडो लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन फरार झाला आहे.

अंबर दलाल बेपत्ता झाल्यानंतर सगळ्याच गुंतवणूकदारांनी मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाच्या आर्थिक व्याप्तीमुळे आता या संपूर्ण प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येणार आहे. अंबर दलाल विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, कलम ४०९ आणि कलम ४०६ अंतर्गत फसवणुकीचा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत अन्नू कपूरसह एकूण ४०७ जणांची फसवणूक करणारा अंबर दलाल याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अंबर दलाल लोकांना गुंतवणुकीवर १८ ते २२ टक्के वार्षिक परतावा देत होता.

अभिनय नव्हे तर राणी मुखर्जीला ‘या’ क्षेत्रात करायचे होते काम! ‘अशी’ झाली कारकिर्दीची सुरुवात

कुटुंबातील सदस्य ५-६ वर्षांपासून करत होते गुंतवणूक!

कष्टाने कमावलेले पैसे अशाप्रकारे लुबाडले गेल्यानंतर अन्नू कपूर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, ते आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या ५-६ वर्षांपासून अंबर दलालच्या माध्यमातून त्याच्या फर्ममध्ये गुंतवणूक करत होते. मात्र, गेल्या महिन्यापासून अंबर दलाल या व्यक्तीने लोकांनी गुंतवणूक केलेल्या पैशांवर नफा देणे बंद केले. इतकेच नाही तर, तो त्याच्या घरातूनही बेपत्ता झाला आहे. आता पोलिसही त्याला शोधात असून, त्याचा थांगपत्ता लागत नाहीये.

अन्नू कपूर यांनी सांगितले की, अंबर दलाल हा त्यांच्याच बिल्डिंगमध्ये राहत होता. त्यामुळे अन्नू कपूर हे अंबर दलालला ओळखत होते. आर्थिक फसवणुकीचा शिकार झालेले अन्नू कपूर म्हणाले की, कोट्यावधी रुपये अशा प्रकारे लुटले गेले असल्याने, ते आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Whats_app_banner