मराठी मनोरंजनाचा बॉस अर्थात 'बिग बॉस मराठी'चा नवा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाचा पाचवा सिझन हा प्रेक्षकांसाठी खास ठरत आहे. कारण सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये कलाकारांसोबतच काही सोशल मीडिया इन्फ्लूएंसर देखील सहभागी झाले आहेत. त्यातीलच एक चर्चेत असणारं नाव म्हणजे गोलीगत सूरज चव्हाण. सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत असणारा सूरज चव्हाणने प्रेक्षकांना विशेष स्टाईलने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. पण घरात मात्र त्याच्याशी काही स्पर्धक नीट वागत नसल्याचे पाहायला मिळते.
मराठी इंडस्ट्रीमधील काही कलाकारांनी पोस्ट शेअर करत सूरजला पाठिंबा दिला आहे. पुष्कर जोग, जय दुधाणे, प्रणित हाथे, उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे अशा अनेक कलाकारांनी अभिनेत्री निक्की तांबोळी विरोधात पोस्ट केल्या. आता ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्याने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सूरज चव्हाणला मिळणाऱ्या वागणुकीवरून संतप्त पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत.
‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढवेने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने सूरज चव्हाणला पाठिंबा दिला आहे. तसेच सूरजला मिळणारी वागणूक पाहून संताप व्यक्त केला आहे. “दोन्ही वेळेची भांडी, साफसफाई, चपला ज्या त्याच्या नाहीत तरीही सूरजने का करावं? सूरज सारखा काहीच होऊ शकत नाही (जे समाजवेगळे दिसतात, वागतात, बोलतात अशा सगळ्याना बोलणारे ९०%) तो या शो मध्ये या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतोय. तरीही सगळ्यांना आपला गेम खेळायचा आहे. पण तो सगळं बघून घाबरलाय. हापशीवर (हँडपंप) होणाऱ्या भांडणापेक्षा हे लय बेकार आहे आणि एवढे सुंदर दिसणारे लोक असे का वागत असतील? कदाचित यात तो अडकलाय. बाकी लोकं, भांडी घासता येत नाही म्हणून रडणारे आणि जरी तुझे जोडे नसतील तर ते बाजूला ठेव सांगणारे आणि माझे नाहीत मी नाही उचलणार म्हटल्यावर सूरजवर चढ चढ चढतात! बाकी जातीवाद, वर्णवाद आणि वर्गवाद, सहानुभूती यावर मी बोलू शकत नाही. एवढी माझी समज नाही” असे त्याने म्हटले आहे.
वाचा: 'तुम सब उसको डरा सकते हो, हरा नहीं सकते', उत्कर्ष शिंदेचा गोलिगत सूरज चव्हाणला पाठिंबा
सूरज चव्हाणने 'टिक टॉक'च्या पहिल्या दहात स्थान मिळवले होते. त्याचा गुलिगत हा डायलॉग तुफान चर्चेत असायचा. त्याला बिग बॉसच्या घरात पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. सूरजचे आता इन्स्टाग्राम अकाऊंटवर ९ लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तो मूळचा बारामतीचा आहे.