Ankita Lokhande Bigg Boss 17: 'बिग बॉस १७'चा ग्रँड फिनाले अतिशय नेत्रदीपक आणि धमाकेदार होता. रविवार पार पडलेल्या या ग्रँड फिनाले सोहळ्यात खूप धमाल, नाचगाणी, गायन आणि भरपूर विनोद पाहायला मिळाले. कॉमेडीयन मुनव्वर फारुकी या सीझनचा विजेता ठरला. मुनव्वर फारुकीने ‘बिग बॉस १७’ची ट्रॉफी पटकावली आणि यासोबतच ५० लाख रुपयांची बक्षीस रक्कम आणि एक चमकणारी कार देखील जिंकली आहे. महाअंतिम फेरीत अभिषेक कुमार, अंकिता लोखंडे यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. काही लोकांना अभिषेक आणि अंकिता जिंकतील अशी अपेक्षा होती. सोशल मीडियाच्या ट्रेंडनुसार, अंकिता ‘टॉप २’मध्ये पोहोचेल असे म्हटले जात होते. परंतु, तिला ‘टॉप ४’मध्येच बाहेर काढण्यात आले. शोमधून बाहेर पडल्यानंतर आता तिचा एका व्हिडीओ समोर आला आहे, जो सध्या व्हायरल होत आहे. यामुळे अंकिता ट्रोल होत आहे.
‘बिग बॉस १७’ हा शो संपल्यानंतर आणि विजेत्याची घोषणा झाल्यानंतर अंकिता शोच्या सेटवरून बाहेर आली, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर अजिबात हसू दिसत नव्हते. तर, यावेळी तिची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तिला मीडिया आणि चाहत्यांच्या गर्दीने घेरले होते. मात्र, अंकिता लोखंडे शोमधून बाहेर आली आणि थेट तिच्या कारच्या दिशेने निघून गेली. यावेळी अंकिता लोखंडे हिच्यासोबत तिची आई होती. दोघेही कार जवळ जात असताना मीडियाला टाळताना दिसल्या. अंकिता लोखंडे हिने यावेळी कोणाच्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.
आता अंकिता लोखंडेचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अंकिता लोखंडे हिच्या या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले, 'तिला मन्नाराचा खूप हेवा वाटत होता. मन्नारा प्रत्येकालाच गोंधळात टाकणारे व्यक्तिमत्व आहे, पण किमान ती खरी आहे. आशा आहे की, अंकिताला आता जमिनीवर कसे राहायचे ते शिकायला मिळाले असेल.’ आणखी एकाने कमेंट केली की, 'मन्नारामुळे अंकिता लोखंडे नाराज आली आहे.' तर, ‘तिचा इगो दुखावला गेला आहे’, अशी कमेंटही एका यूजरने केली आहे.
नुकताच ‘बिग बॉस १७’चा महाअंतिम सोहळा पार पडला आहे. ‘बिग बॉस १७’च्या ‘टॉप ५’ स्पर्धकांमध्ये अंकिता लोखंडे हि ‘टॉप ४’ स्थानावर होती. तर, मुनव्वर आणि अभिषेकसोबत मन्नारा ‘टॉप ३’मध्ये होती. मात्र, ‘टॉप २’पर्यंत पोहोचल्यावर मन्नारा चोप्रा हिचा प्रवासही संपुष्टात आला.