Anil Kapoor And Anupam Kher meets Rishabh Pant : भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा शुक्रवारी (३० डिसेंबर) पहाटे मोठा अपघात झाला. रुरकीजवळ त्याची भरधाव कार दुभाजकाला धडकली. पंत स्वतः कार चालवत होता. या अपघातात ऋषभ पंत जबर जखमी झाला आहे. सध्या ऋषभ पंतवर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर आणि अनिल कपूर यांनी देखील रुग्णालयात जाऊन ऋषभ पंत याची भेट घेतली. या भेटीत आपण त्याला खूप हसवलं आहे, अशी प्रतिक्रिया दोघांनीही दिली आहे.
यावेळी अनिल कपूरने आणि अनुपम खेर यांनी ऋषभ पंतच्या प्रकृतीची अपडेट दिली आहे. यावेळी अनिल कपूर म्हणाले की, 'तो आता ठीक आहे. आम्हाला जितकी काळजी वाटत होती, तितकं काळजी करण्याचं आता काही कारण नाही.’ पुढे बोलताना अनुपम खेर आणि अनिल कपूर म्हणाले की, 'आम्ही त्याला थोडे हसवण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्याला बॉलिवूड स्टार नव्हे, तर मित्र म्हणून भेटायला गेलो होतो.’ अनुपम खेर म्हणाले की, 'मला वाटतं की त्यांनी अशा वेळी लोकांना भेटायला जावं, जेव्हा त्यांना आपली सगळ्यात गरज असते. हॉस्पिटलचा प्रोटोकॉल पाळून आम्ही त्याची भेट घेतली आहे.’
ऋषभ पंतला भेटल्यानंतर आणि त्याच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर अनुपम खेर आणि अनिल कपूर अतिशय सकारात्मक दिसत होते. त्यांनी म्हटले की, ऋषभ पंत लवकरच बारा होऊन, मैदानावर परतेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी ऋषभ पंत त्याच्या आईला सरप्राईज देण्यासाठी रुरकीला जात होता. ऋषभ पंत स्वत: कार चालवून आपल्या गावी प्रवास करत होता. मात्र, वाहनाच्या वेगावर कंट्रोल न आल्यामुळे त्याचा अपघात झाला. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली असली तरी सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे.
संबंधित बातम्या