Andre Braugher Death: नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध 'ब्रुकलिन नाईन-नाईन' या सीरिजमध्ये 'कॅप्टन रे होल्ट'ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेते आंद्रे ब्राउगर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या टीमने या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'होमिसाईड: लाइफ ऑन द स्ट्रीट' आणि 'ब्रुकलिन नाईन नाईन' या वेब सीरिजमधील भूमिकांसाठी ते खूप प्रसिद्ध होते. त्यांनी प्रतिष्ठित एमी पुरस्कार देखील पटकावला होता. सोमवारी वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आंद्रे ब्राउगर यांचे पब्लिसिस्ट जेनिफर ऍलन यांनी अभिनेत्याच्या निधनाची माहिती देताना माध्यमांना सांगितले की, आंद्रे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
आंद्रे ब्राउगर यांचा जन्म शिकागोमध्ये झाला होता. त्यांनी १९८९मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ग्लोरी या चित्रपटामधून त्यांनी मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांनी मॉर्गन फ्रीमन आणि डेन्झेल वॉशिंग्टन यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. हॉलिवूडमध्ये काम मिळवताना त्यांना खूप संघर्ष करावा लागला होता. त्यावेळी हॉलिवूडमध्ये आफ्रिकन कलाकारांसाठी फारच कमी अगदी मोजक्याच भूमिका होत्या. अशावेळी काम मिळवताना अनेक अडचणी आल्याचे आंद्रे ब्राउगर यांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते.
मात्र, या सगळ्यातही त्यांनी स्वतःची एक हक्काची जागा प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली होती. 'होमिसाईड: लाइफ ऑन द स्ट्रीट' या वेब सीरिजच्या सात सीजन्समध्ये त्यांनी 'डेट. फ्रँक पेम्बलटन' साकारून प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. ११ वेळा नॉमिनेश आणि २ वेळा एमी पटकावणारे अभिनेते आंद्रे ब्राउगर हे प्रेक्षकांचे लाडके होते. अनेक वर्ष 'होमिसाईड: लाइफ ऑन द स्ट्रीट' सारख्या वेब सीरिजमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची भूमिका केल्यानंतर त्यांनी विनोदी भूमिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला होता. 'ब्रुकलिन नाईन-नाईन'मध्ये कॅप्टन रे होल्टची भूमिका साकारून ते कॉमेडीकडे वळले.
'होमिसाईड: लाइफ ऑन द स्ट्रीट' या सीरिजमध्ये काम करत असतानाच ते सहअभिनेत्री अमी ब्रॅबसन यांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नगाठ बांधली होती. या जोडीला तीन अपत्ये देखील आहे.
संबंधित बातम्या