व्लॅागरने शूट केला मृतदेहासोबत व्हिडीओ; 'लाईक आणि सबस्क्राइब'चा रहस्यमयी टीझर प्रदर्शित-amruta khanvilkar upcoming movie like ani subscribe teaser is out ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  व्लॅागरने शूट केला मृतदेहासोबत व्हिडीओ; 'लाईक आणि सबस्क्राइब'चा रहस्यमयी टीझर प्रदर्शित

व्लॅागरने शूट केला मृतदेहासोबत व्हिडीओ; 'लाईक आणि सबस्क्राइब'चा रहस्यमयी टीझर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 13, 2024 11:57 AM IST

Like Ani Subscribe Teaser: 'लाईक आणि सबस्क्राइब' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपट चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Like Ani Subscribe Teaser
Like Ani Subscribe Teaser

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अमेय वाघ महत्त्वाच्या भूमिकेत असणारा 'लाईक आणि सबस्क्राइब' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली होती. अशातच 'लाईक आणि सबस्क्राइब' या चित्रपटाचा रहस्यमयी टीझर प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत आतुरता वाढली आहे.

काय आहे चित्रपटाचा टीझर

'लाईक आणि सबस्क्राइब' या चित्रपटाचा टीझर पाहाताना अंगावर शहारे येतात. टीझरमध्ये जुई भागवत एका व्लॅागरच्या भूमिकेत दिसत असून ती एका मोठ्या संकटात अडकल्याचेही दिसतेय. चुकून ती मृतदेहासोबत व्हिडीओ शूट करते. तर दुसरीकडे अमृता खानविलकरही पोलिसांच्या मदतीने कशाचा तरी शोध घेत आहे. त्यामुळे या सगळ्याचा परस्परांशी काही संबंध आहे का? डेड बॉडी प्रकरण काय आहे? कोणी कोणाचा खून केला? अमृता खानविकार कोणत्या पुराव्यांच्या शोधात आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला ''लाईक आणि सबस्क्राईब' पाहून मिळणार आहेत. चित्रपटाचा हा रहस्यमयी टिझर पाहून कथा कमाल असणार असा अंदाज वर्तवला जात आहे.

चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

काही दिवसांपूर्वी 'लाईक आणि सबस्क्राईब' चित्रपटाचे एक पोस्टर प्रदर्शित झाले होते. त्यात अमृता खानविलकर, जुई भागवत आणि अमेय वाघ यांचा एक सेल्फी होता. ज्यात सेल्फी आणि प्रत्यक्षातील चेहऱ्यावरील हावभाव खूप वेगळे होते. त्यामुळे यामागे काय रहस्य दडले आह, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरने प्रेक्षकांच्या मनात आता अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर मिळणार आहेत.
वाचा: 'बिग बॉस मराठी'साठी अभिजीत-निक्कीने घेतले लाखो रुपये, सूरज चव्हाणला आठवड्याला किती मिळते फी?

कधी होणार प्रदर्शित?

'लाईक आणि सबस्क्राइब' हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. चित्रपटात अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. तसेच 'लाईक आणि सबस्क्राइब' हा रहस्यमयपट प्रेक्षकांची मने जिंकण्यास सज्ज झाला आहे. टीझरमधील गुपीतं कशी उलगडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, प्रेक्षकांना १८ ऑक्टोबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Whats_app_banner